Pakistan vs Bangladesh, WTC Latest Points Table: बांगलादेश क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत रावळपिंडी कसोटी सामन्यात पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचापाकिस्तानविरुद्धचा हा पहिला कसोटी विजय ठरला. या सामन्यात बाबर आझमच्या पाकिस्तानने बांगलादेशला शेवटच्या डावात अवघे ३० धावांचे लक्ष्य दिले होते. ते त्यांनी एकही गडी न गमावता पूर्ण केले. घरच्या मैदानावर पाकिस्तानला पहिल्यांदाच कसोटी सामन्यात १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानला विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा फटका बसला.
पाकिस्तानची गुणतालिकेत घसरण
बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या पॉइंट टेबलमध्येही धक्का बसला आहे. पाकिस्तानचा संघ आता आठव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानचे आतापर्यंत ६ सामन्यांत २ विजय आणि ४ पराभव यासह २२ गुण आहेत. तर पाकिस्तानची गुणांची टक्केवारी ३०.५६ आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा संघ आता सहाव्या स्थानावर आला आहे. बांगलादेशचे ५ सामन्यांत २४ गुण असून गुणांची टक्केवारी ४० झाली आहे.
भारतीय संघ कितवा?
सध्या भारतीय संघ ६८.५२ टक्के गुणांसह WTC च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत भारताने ९ सामन्यांत सहा विजय, दोन पराभव आणि एक अनिर्णित सामना असे ७४ गुण मिळवले आहेत. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात भारतीय संघाला आणखी १० कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. बांगलादेशनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत.
ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे १२ सामन्यांत आठ विजय, तीन पराभव आणि एक अनिर्णित असे ९० गुण आहेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी ६२.५० आहे. न्यूझीलंड तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, श्रीलंका पाचव्या, बांगलादेश सहाव्या, दक्षिण आफ्रिका सातव्या, पाकिस्तान आठव्या तर वेस्ट इंडिज नवव्या स्थानावर आहे.