PAK vs BAN 2nd Test : पाकिस्तानला आपल्या मायदेशात बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला. यासह पाहुण्या बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे दुसरा सामना पाकिस्तानसाठी 'करा किंवा मरा' असा असेल. कारण आपल्या घरात मालिका बरोबरीत संपवण्याचे मोठे आव्हान शान मसूदच्या नेतृत्वातील संघासमोर आहे. या मालिकेतील दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान खेळवला जाईल. सलामीच्या सामन्यात बांगलादेशच्या फिरकीपटूंनी कमाल करत यजमानांची पळता भुई थोडी केली. त्यामुळे अखेरच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत फिरकीपटू अबरार अहमदला संघात सामील केले.
अबरार अहमद आणि कामरान घुलाम यांची संघात एन्ट्री झाली आहे. या दोन्हीही शिलेदारांना बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी संघातून बाहेर केले होते. नुकताच बाप झालेला शाहीन शाह आफ्रिदी वैयक्तिक कारणास्तव घरी परतला होता. तो मंगळवारी पुन्हा संघासोबत जोडला आहे. खरे तर दोन नवीन खेळाडूंचा संघात समावेश झाला असला तरी त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते की नाही हे पाहण्याजोगे असेल.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अबरार अहमद, अब्दुला शफीक, बाबर आझम, कामरान घुलाम, खर्राम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरेर्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला.