PAK vs BAN 2nd Test Match : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तानात गेला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशसमोर यजमानांना कडवी झुंज देण्याचे मोठे आव्हान असेल. २१ ऑगस्टपासून मालिका खेळवली जाईल. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. याआधी मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हापासून ते विजयाच्या शोधात आहेत. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख खेळाडू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर कोणतीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तर सौद शकीलला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशातच पीसीबीच्या एका निर्णयामुळे माजी खेळाडू कामरान अकमलने संताप व्यक्त केला.
दरम्यान, कराची येथे होणारा दुसरा कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय पार पडेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात पार पडणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कराची येथील नॅशनल बँक क्रिकेट स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश नसेल. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर यादरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. एक निवेदन काढून पीसीबीने प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकत नाही याबाबत खेद व्यक्त केला. पण, हे पाऊल केवळ प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आले असून, आगामी काळात आयसीसीची स्पर्धा होत असल्याने नवीन प्रेक्षक गॅलरीचेही काम सुरू असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.
कामरान अकमलने सांगितले की, दुसरा कसोटी सामना कराची येथे खेळवला जाईल. माझ्या माहितीनुसार स्टेडियमची दुरूस्ती सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदान तयार करत आहेत. पण, प्रेक्षकांना नो एन्ट्री असणे म्हणजे पाकिस्तानची खिल्ली उडवल्यासारखे आहे. पाकिस्तानात प्रेक्षकांशिवाय सामने होत असतील तर सगळेच आपल्याला ट्रोल करतील. पाकिस्तानात फक्त २-३ स्टेडियम नाहीत, फैसलाबाद येथे पण स्टेडियम आहे. मुल्तानमध्ये एक स्टेडियम आहे ते स्टेडियम खूप चांगले आहे. तिथेही गर्दी जमते. त्यामुळे या दोनपैकी कोणत्याही स्टेडियमवर आणखी एक कसोटी सामना खेळवायला हवा होता. प्रेक्षकांशिवाय सामना झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर ही आपल्या क्रिकेटची चेष्टा होईल, असे मला वाटते. अकमल त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता.
PAK vs BAN कसोटी मालिकापहिला सामना, रावळपिंडी (२१ ते २५ ऑगस्ट)दुसरा सामना, कराची (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)