England Joe Root Breaks Sachin Tendulkar 3 Record : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट सातत्याने सर्वोत्तम खेळाचा नजराणा पेश करताना दिसतोय. पाकिस्तान विरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतही त्याने एकदम जबरदस्त खेळी करून दाखवली. "इस 'रुट' की लाइन रेकॉर्ड ब्रेक करने में व्यस्त है" अशाच तोऱ्यात जो रुट सातत्यपूर्ण खेळी करताना दिसत आहे. मुल्तानच्या मैदानात त्याने तेच दाखवून दिले. या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जो रुटच्या भात्यातून द्विशतकी खेळी आली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे सहावे द्विशतक आहे. यासह त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ३ विक्रम त्याने मागे टाकले आहेत.
घराबाहेर सर्वाधिक द्विशतकांचा रेकॉर्ड
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात जो रुटनं २६२ धावांची खेळी केली. यासह त्याने चौथ्यांदा घराबाहेर द्विशतकी करण्याचा पराक्रम केला. त्याच्या या खेळीमुळे मास्टर ब्लास्टर सचिनचा मोठा विक्रम त्याने मागे पडला. सचिन तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीत ६ द्विशतक झळकावली. यातील ३ घरच्या मैदानावर तर तीन बाहेरच्या मैदानात आली आहेत.
पाकमधील सर्वोच्च वैयक्तिक धावासंख्या
जो रुटनं मुल्तान कसोटीतील दमदार खेळीसह पाकिस्तानच्या मैदानातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली. पाकच्या मैदानातील सचिनला मागे टाकत तो सर्वाधिक धावा करणारा बॅटर ठरला. २००४ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मुल्तान कसोटीत नाबाद १९४ धावांची खेळी केली होती. सचिनच्या या खेळीवर जो रुटची खेळी भारी पडली.
कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या
कसोटीतील सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड नावे असलेल्या मास्टर ब्लास्टरनं आपल्या कारकिर्दीत जी सर्वोच्च खेळी केली ती नाबाद २४८ धावांची आहे. जो रुट याबाबतीतीतही आता सचिनच्या पुढे आहे. पाकिस्तान विरुद्धची २६२ धावांची खेळी त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.