PAK vs ENG Live | मुल्तान : पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात यजमान पाकिस्तानने ५५६ धावा कुटल्या. शान मसूदच्या (१५१) अप्रतिम खेळीसह पाकिस्तानच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. पाकिस्तानने धावांचा डोंगर उभारल्याने इंग्लंडचा संघ दडपणाखाली येईल असे यजमानांना अपेक्षित होते. मात्र, तसे काही न होता जो रुट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. पहिल्या सामन्यातील तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने चांगली कामगिरी करुन पाकिस्तानची डोकेदुखी वाढवली.
पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात १४९ षटकांत ५५६ धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुला शफीक (१०२), सैय अयुब (४), शान मसूद (१५१), बाबर आझम (३०), सौद शकील (८२), नसीम शाह (३३), मोहम्मद रिझवान (०), अघा सलमान (नाबाद १०४), आमिर जमाल (७), शाहीन आफ्रिदी (२६) आणि अबरार अहमदने (३) धावा केल्या. फलंदाजांना मदतशीर असलेल्या खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांनी चांगली खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर गस एटकिंसन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि जो रुट यांना १-१ बळी घेता आला.
पाकिस्तानप्रमाणे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी देखील खेळपट्टी धावून आली. एकूणच दोन्हीही संघांच्या फलंदाजांसाठी खेळपट्टी पोषक असल्याचे दिसते. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने १०१ षटकांत ३ बाद ४९२ धावा केल्या. आताच्या घडीला पाहुणा इंग्लिश संघ ६४ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडकडून जॅक क्रॉली (७८), ओली पोप (०) आणि बेन डकेट (८४) धावा करुन बाद झाला. तर जो रुट (१७६) आणि हॅरी ब्रूक (१४१) धावा करुन खेळपट्टीवर टिकून आहेत.
पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुला शफीक, बाबर आझम, सौद शकील, नसीम शाह, मोहम्मद रिझवान, अघा सलमान, आमिर जमाल, शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद.
इंग्लंडचा संघ -ओली पोप (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स (पदार्पण), जॅक लीच, शोएब बशीर.