PAK vs ENG Live | मुल्तान : मागील काही कालावधीपासून पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला प्रत्येक संघ यजमान संघाला वरचढ ठरला आहे. मग न्यूझीलंड असो की बांगलादेश की इंग्लंड... प्रत्येक संघाने पाकिस्तानची त्यांच्या घरात जाऊन बेक्कार धुलाई केली. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी सपाट खेळपट्टीचा फायदा घेत ५०० पार धावसंख्या पोहोचवली. कर्णधार शान मसूदने १५१ धावांची अप्रतिम खेळी केली.
पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात १४९ षटकांत ५५६ धावा करुन टीकाकारांना तूर्त शांत ठेवले. मात्र, इंग्लंडचा डाव सुरू होताच इंग्लिश संघाने शेजाऱ्यांना इतिहासाची जाणीव करुन दिली. चिवट खेळीसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश शिलेदार पाकिस्तानवर तुटून पडले. कर्णधार ओली पोपचा (०) अपवाद वगळता इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. कसोटी क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेल्या जो रुटने सुरुवातीला संयम आणि मग रुद्रावतार दाखवत द्विशतकी खेळी केली. त्याला हॅरी ब्रूकने चांगली साथ देताना तो देखील द्विशतकापर्यंत पोहोचला. पहिला सामना अनिर्णित होईल अशी चर्चा सध्या तरी आहे... मात्र, पाकिस्तानी संघाचा इतिहास पाहता ते पराभव स्वीकारतील अशीही शक्यता आहे.
पाकिस्तानने धावांचा डोंगर उभारल्याने इंग्लंडचा संघ दडपणाखाली येईल असे यजमानांना अपेक्षित होते. मात्र, तसे काही न होता जो रुट आणि हॅरी ब्रूक यांनी किल्ला लढवला. पहिल्या सामन्यातील तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने चांगली कामगिरी करुन पाकिस्तानची डोकेदुखी वाढवली. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने १०१ षटकांत ३ बाद ४९२ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपासून रुट-ब्रूकच्या जोडीने आक्रमक खेळ करत धावगती वाढवली. १३० षटकांपर्यंत इंग्लंडने ३ बाद ६५८ धावा करुन १०२ धावांची आघाडी घेतली. आताच्या घडीला जो रुट (नाबाद २५९) आणि हॅरी ब्रूक (नाबाद २१८) धावा करुन खेळपट्टीवर टिकून आहेत. या जोडीसमोर पाकिस्तानच्या कोणत्याच गोलंदाजाचा निभाव लागत नसल्याचे दिसते. मजबूत आघाडी घेऊन इंग्लिश संघ डाव घोषित करण्याच्या तयारीत आहे.
तत्पुर्वी, पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात १४९ षटकांत ५५६ धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुला शफीक (१०२), सैय अयुब (४), शान मसूद (१५१), बाबर आझम (३०), सौद शकील (८२), नसीम शाह (३३), मोहम्मद रिझवान (०), अघा सलमान (नाबाद १०४), आमिर जमाल (७), शाहीन आफ्रिदी (२६) आणि अबरार अहमदने (३) धावा केल्या. फलंदाजांना मदतशीर असलेल्या खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांनी चांगली खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर गस एटकिंसन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि जो रुट यांना १-१ बळी घेता आला.
पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुला शफीक, बाबर आझम, सौद शकील, नसीम शाह, मोहम्मद रिझवान, अघा सलमान, आमिर जमाल, शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद.
इंग्लंडचा संघ -ओली पोप (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स (पदार्पण), जॅक लीच, शोएब बशीर.