Pakistan Captain Shan Masood, PAK vs ENG 2nd Test: पाकिस्तानविरूद्धचा पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ७ बाद ८२३ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर पाकिस्तानला तिसऱ्या डावात केवळ २२० धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी सामना जिंकला. या ऐतिहासिक सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूकने ३१७ आणि जो रुटने २६२ धावांच्या खेळी केल्या. त्यात पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांनी प्रत्येकी १००हून अधिक धावा दिल्या. पाक गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केल्यानंतर फलंदाजीतही पाकिस्तान कमकुवत ठरले. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान कर्णधार शान मसूद काय म्हणाला, जाणून घेऊया.
गोलंदाजांना २० विकेट्स काढाव्याच लागतील
"सगळे जण सध्या पाकिस्तानच्या तिसऱ्या डावातील फलंदाजीबद्दल बोलत आहेत. पण एक लक्षात ठेवायला हवे की जेव्हा एखादा संघ पहिल्या डावात ५५० धावा करतो तेव्हा पुढच्या डावात गोलंदाजांनी देखील विरोधकांवर दबाव आणून झटपट १० विकेट्स घेतल्या पाहिजेत. पण आम्हाला ही गोष्ट जमली नाही. दुसऱ्या डावातील आमची गोलंदाजी आणि इंग्लंडची फलंदाजी यामुळे आम्ही सामन्यात मागे पडलो. सामन्याची चांगली सुरूवात करणे आणि त्यानंतर आघाडी कायम राखत सामना जिंकणे हा चांगल्या क्रिकेटचा मूलमंत्र आहे. आमच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांकडून शिकायला हवे. त्यांनी आमच्या २० विकेट्स काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढले. आमच्या संघापुढे आता हेच आव्हान असणार आहे," असे पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद म्हणाला.
कसोटी मालिका अजून संपलेली नाही...
"कसोटी मालिका अजून संपलेली नाही. आम्ही सिरीजच्या मध्यात आहोत. आम्ही आमच्या संघाच्या मानसिकतेचा विचार करत आहोत. कसोटी क्रिकेट हे एक अत्युच्च दर्जाचे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये संघाला चांगला मार्ग शोधण्यासाठी पुन्हा संधी मिळते. फक्त खेळाडूंनी हे लक्षात ठेवायला हवे की कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणे आणि विकेट्स घेणे या दोन गोष्टी अपिरहार्य आहेत," असे सूचक विधान शान मसूदने केले.
आम्हाला शक्य तितक्या लवकर...
"आम्हाला क्रिकेट खेळायला आवडते, सामन्याच्या निकालामुळे काही वेळा वाईट वाटते, काही वेळ निकाल पाहून देश म्हणूनही वाईट वाटते, पण त्या सगळ्यातून बाहेर येण्याची ताकद देखील हा खेळच देतो. पाकिस्तान क्रिकेट आम्हाला सर्वतोपरि सहकार्य करत आहे, पण त्यांना अपेक्षित विजयी निकाल आम्ही देऊ शकत नाहीये. त्यामुळे आम्हाला आता लवकरात लवकर एक समतोल खेळाडूंचा गट म्हणून पुन्हा संघबांधणी करावी लागेल.