Join us  

PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला

PAK vs ENG 1st Test Live : सलामीच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानची बेक्कार धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 1:59 PM

Open in App

PAK vs ENG 1st Test Match Live Updates | मुल्तान : पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने सलामीच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. जो रुट आणि हॅरी ब्रूक यांनी द्विशतके झळकावून पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी सपाट खेळपट्टीचा फायदा घेत ५०० पार धावसंख्या पोहोचवली. कर्णधार शान मसूदने १५१ धावांची अप्रतिम खेळी केली. मात्र, इंग्लंडचा डाव सुरू होताच इंग्लिश संघाने शेजाऱ्यांना इतिहासाची जाणीव करुन दिली. चिवट खेळीसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश शिलेदार पाकिस्तानवर तुटून पडले. कर्णधार ओली पोपचा (०) अपवाद वगळता इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. कसोटी क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेल्या जो रुटने सुरुवातीला संयम आणि मग रुद्रावतार दाखवत द्विशतकी खेळी केली. त्याला हॅरी ब्रूकने चांगली साथ देताना तो देखील द्विशतकापर्यंत पोहोचला मग त्याने त्रिशतक झळकावून आपला इरादा स्पष्ट केला.  

रुट ३७५ चेंडूत १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावा करुन बाद झाला, तर हॅरी ब्रूक द्विशतक झळकावून खेळपट्टीवर कायम आहे. दरम्यान, मुल्तान कसोटीत इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ७०० धावांचा आकडा गाठून इतिहास रचला. या आधी भारतीय संघाने पाकिस्तानात पाहुणा संघ म्हणून सर्वाधिक धावा केल्या होत्या. टीम इंडियाने २००४ मध्ये ६७५ धावा करण्याची किमया साधली. पण, आता भारताचा हा विक्रम मोडण्यात इंग्लिश संघाला यश आले.

तत्पुर्वी, पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात १४९ षटकांत ५५६ धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुला शफीक (१०२), सैय अयुब (४), शान मसूद (१५१), बाबर आझम (३०), सौद शकील (८२), नसीम शाह (३३), मोहम्मद रिझवान (०), अघा सलमान (नाबाद १०४), आमिर जमाल (७), शाहीन आफ्रिदी (२६) आणि अबरार अहमदने (३) धावा केल्या. फलंदाजांना मदतशीर असलेल्या खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांनी चांगली खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर गस एटकिंसन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि जो रुट यांना १-१ बळी घेता आला.

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तानजो रूटभारतीय क्रिकेट संघ