PAK vs ENG 1st Test Live | मुल्तान : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने पाकिस्तानविरुद्धच्या शतकी खेळीसह भारताचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढला. गावस्करांचा ३४ शतकांचा विक्रम मोडताना रुटने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतकी खेळी केली. यजमान पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावांचा डोंगर उभारला. फलंदाजांना मदतशीर असलेल्या या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाज देखील लय पकडत आहेत. इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रुट आणखी एक विक्रम करण्यात यशस्वी ठरला. (Most runs for England in Test cricket) इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून रुटच्या नावाची नोंद झाली आहे. त्याने या यादीत माजी कर्णधार ॲलिस्टर कुकला मागे टाकत अव्वल स्थान गाठले. आता रुटने ३५वे शतक झळकावण्याची किमया साधली.
तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात रुटने त्याचे शतक पूर्ण केले. अबरार अहमदच्या षटकात एक धाव काढून इंग्लिश फलंदाजाने शतकाला गवसणी घातली. गावस्करांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतकांची नोंद आहे. त्यांनी १९८६ मध्ये कानपूर कसोटीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून ३४वे शतक झळकावले होते. पण, ३५वे शतक ठोकताच रुटने गावस्करांसह महेला जयवर्धने, ब्रायन लारा आणि युनूस खान यांना मागे टाकले.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सलामीचा कसोटी सामना मुल्तान येथे खेळवला जात आहे. तत्पुर्वी, या सामन्यातील आपल्या पहिल्या डावात रुटने ७१ धावा करताच नव्या विक्रमाला गवसणी घातली. कुकने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १२,४७२ धावा केल्या आहेत, तर रुटने हा जादुई आकडा गाठून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचवे स्थान पटकावले.
कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर - १५,९२१ धावारिकी पाँटिग - १३,३७८ धावाजॅक कॅलिस - १३,२८९ धावाराहुल द्रविड - १३,२८८ धावाजो रुट - १२,४७३* धावाॲलिस्टर कुक - १२,४७२ धावाकुमार संगकारा - १२,४०० धावा