Harry Brook warning to Pakistani Bowlers, PAK vs ENG 1st Test: इंग्लंडचा मधल्या फळीतील तडाखेबंद फलंदाज हॅरी ब्रूक याच्या झंजावाती त्रिशतकाच्या जोरावर इंग्लंडनेपाकिस्तानला त्यांच्याच घरात पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ७ बाद ८२३ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर पाकिस्तानला तिसऱ्या डावात केवळ २२० धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी सामना जिंकला. या ऐतिहासिक सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूक आणि जो रुट यांनी ४००हून अधिक धावांची भागीदारी केली. त्यात हॅरी ब्रूकने तुफानी खेळी केली. सामना संपल्यावर तो खेळीबाबत बोलला.
"मी माझी फलंदाजी खूप एन्जॉय केली. मैदानावर खूप ऊन होतं, पण मला बॅटिंग करताना मजा आली. जो रुटसोबत फलंदाजी करायची असल्याने मला जास्त छान वाटले. आम्ही मनात असे ठरवले होते की शक्य तेवढा जास्तीत जास्त फलंदाजी करत राहायची. लंचपर्यंत जेवढे जमेल तेवढ्या धावा करायच्या. बॅटिंगची मजा घ्यायची, भागीदारी अधिक भक्कम करायची, सारखी एकेरी-दुहेरी धाव घेत राहायची आणि धावा करत राहायच्या हाच आमचा प्लॅन होता. हे पिच फलंदाजीसाठी उत्तम होते. पाकिस्तानात आणखी बरीच शतके ठोकेन अशी आशा आहे," अशी प्रतिक्रिया हॅरी ब्रूकने व्यक्त केली.
दरम्यान, पहिल्या डावात कर्णधार शान मसूदचे दीडशतक (१५१), सलमान अली आगा (१०४) आणि सलामीवीर अब्दुल्ला शफीक (१०२) यांची शतके याच्या जोरावर पाकिस्तानने ५५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात हॅरी ब्रूक (३१७) आणि जो रूट (२६२) यांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद ८२३ धावांवर डाव घोषित केला. तर पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांतच आटोपला. जॅक लीचने ३० धावांत ४ बळी घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला.