Join us  

आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांना दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 6:31 PM

Open in App

pak vs eng 2nd test : पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून वगळले. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून पाहुण्या इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरीत मालिकेसाठी काही धाडसी निर्णय घेतले. रविवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उरलेल्या दोन सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला. संघाचा माजी कर्णधार बाबर आझम, प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि युवा गोलंदाज नसीम शाह यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातून डच्चू देण्यात आला. या तिघांना विश्रांती देण्यात आली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले. मात्र, खराब फॉर्मचा सामना करत असलेले हे त्रिकुट साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

दरम्यान, बाबर आणि शाहीनला वगळल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना विश्रांती दिली असल्याचे सांगितले. याचाच दाखला देत भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने शेजाऱ्यांना खोचक टोला लगावला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवताना चोप्राने शाब्दिक हल्ले केले. "आशियामध्ये आम्ही खेळाडूंना डच्चू देत नसून, त्यांना विश्रांती दिली जाते. पण सत्य हे आहे की, आम्ही झेल देखील सोडत नसून, चेंडूला मैदानात विश्रांती देतो", अशा आशयाची पोस्ट करत आकाश चोप्राने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची फिरकी घेतली. 

दुसऱ्या कसोटीसाठी संघ -इंग्लंड - बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ब्रिडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर. पाकिस्तान - शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुला शफीक, कामरान घुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, झाहिद मेहमूद. 

टॅग्स :पाकिस्तानट्रोलबाबर आजमऑफ द फिल्ड