नवी दिल्ली : पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा (Pakistan vs England) कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) नवा विक्रम केला आहे. स्टोक्स आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने आपल्याच संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांची बरोबरी केली आहे.
बेन स्टोक्सने रचला इतिहास मुलतान कसोटीच्या दुसऱ्या डावात ४१ धावा करणाऱ्या स्टोक्सने यादरम्यान एक चौकार आणि एक षटकार ठोकला. यासह इंग्लिश संघाच्या कर्णधाराने या फॉरमॅटमध्ये एकूण १०७ षटकार मारले आहेत. त्याने ८८ सामन्यांच्या १६० डावांमध्ये हा विक्रम केला. न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०१ सामन्यांच्या १७६ डावांमध्ये ही कामगिरी केली. स्टोक्स हा सर्वात वेगवान १०७ कसोटी षटकारांचा विक्रम गाठणारा फलंदाज आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या फॉरमॅटमध्ये आणखी षटकार मारताच तो आपल्या प्रशिक्षकांना देखील मागे टाकेल.
टॉप-10 मध्ये फक्त एकच भारतीयया यादीत ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट १०० षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या वीरेंद्र सेहवागनेही आपल्या कसोटी कारकिर्दीत ९७ षटकार ठोकले आहेत. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. टॉप-10 मध्ये सेहवाग हा एकमेव भारतीय आहे. सध्या जर आपण कसोटी क्रिकेटमधील सक्रिय भारतीय फलंदाजांबद्दल भाष्य केले तर या यादीत रोहित शर्मा ६४ षटकारांसह २३ व्या स्थानावर आहे. तर विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९८ षटकार ठोकले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"