Join us

PAK vs ENG : पाकिस्तानचा 'गब्बर'! एकट्यानं इंग्लंडला लोळवलं; सात बळी अन् धवनसारखे सेलिब्रेशन

साजिद खानने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात सात बळी घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:26 IST

Open in App

PAK vs ENG 2nd Test Match Updates : पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर यजमान पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यातून जोरदार पुनरागमन केले. बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाकावर बसवून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही धाडसी निर्णय घेतले. अनुभवी खेळाडूंना डच्चू दिल्याने नवख्या शिलेदारांना संधी मिळाली. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या कामरान गुलामने पहिल्याच डावात शतकी खेळी केली. त्याने २२४ चेंडूत १ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला आपल्या पहिल्या डावात ३६६ धावा करता आल्या. इंग्लंडला मात्र आपल्या पहिल्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानच्या साजिद खानने अप्रतिम गोलंदाजी करुन इंग्लिश संघाला अवघ्या २९१ धावांत गारद केले. साजिदने २६.२ षटकांत १११ धावा देत सात बळी घेतले.

साजिद खानने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर शिखर धवनच्या शैलीत सेलिब्रेशन केले. भारतीय क्रिकेटचा गब्बर म्हणून ओळख असलेला धवन त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या साजिद खानने धवनप्रमाणे सेलिब्रेशन करताच चाहत्यांनी त्याला पाकिस्तानी गब्बर असे संबोधले. साजिद खानने बेन डकेट, ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, शोएब बशीर आणि मॅथ्यू पोट्स यांना आपल्या जाळ्यात फसवले. पहिल्या सामन्यातील द्विशतकवीर रुट आणि त्रिशतक झळकावणारा ब्रूक देखील साजिदच्या गोलंदाजीवर बाद झाला.

इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक लीच, जेमी स्मिथ, जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, शोएब बशीर आणि मॅथ्यू पोट्स.

पाकिस्तानचा संघ - शान मसूद (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, अघा सलमान, आमिर जमाल, साजिद खान, नोमान अली, जाहिद महमूद.

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडशिखर धवन