Pakistan vs England, 2nd Test : इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर यजमान पाकिस्तानने मुलतान कसोटीत सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली. इंग्लंडचा पहिला डाव २८१ धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तान कसोटीवर मजबूत पकड घेऊ पाहत होते. पण, मुलतानवर 'सुलतान' बनण्याच्या प्रयत्नात त्यांचीच गोची झालेली दिसतेय.
पहिल्या कसोटीतील शतकवीर झॅक क्रॅवली आज १९ धावांवर माघारी परतला. अब्रार अहमदने त्याचा त्रिफळा उडवला. बेन डकेट व ऑली पोप यांनी अर्धशतकी खेळी करताना इंग्लंडचा डाव सावरला होता, परंतु अब्रारच्या फिरकीसमोर त्यांची त्रेधातिरिपीट झाली. बेन डकेट ६३ व पोप ६० धावांवर बाद झाला. जो रूट ( ८) व हॅरी ब्रूक ( ९) यांनाही त्याने स्वस्तात बाद केले. कर्णधार बेन स्टोक्स ( ३०) व विक जॅक्स ( ३१) यांनी संघर्ष दाखवला. पण, अब्रारसमोर ते फार काळ टिकू शकले नाही. महमूदने तिसरी विकेट घेत इंग्लंडचा पहिला डाव २८१ धावांवर गुंडाळला. मार्क वूड ३६ धावांवर नाबाद राहिला. अब्रारने २२-१-११४-७ अशी विक्रमी गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात, अब्दुल्लाह शफिक ( १४) व इमाम-उल-हक ( ०) हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार बाबर आजम व सौद शकील यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. आजने ७५ व शकीलने ६३ धावांची खेळी करताना २ बाद ५१ वरून संघाला २ बाद १४२ धावांपर्यंत नेले. ऑली रॉबिन्सनने पाकिस्तानी कर्णधाराचा त्रिफळा उडवला अन् यजमानांची घसरगुंडी घाली. २ बाद १४२ वरून पाहता पाहता पाकिस्तानचा संपूर्ण संघ २०२ धावांत तंबूत परतला. इंग्लंडने पहिल्या डावात ७९ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या जॅक लीचने ४, मार्क वूड व जो रूट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"