PAK vs ENG 2nd Test : मार्क वुडने चार विकेट्स घेतल्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विजयासाठी ३५५ धावांची गरज असताना, पाकिस्तानने लढा दिला, पण ३२८ धावांवर त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर त्यांना मायदेशात सलग तीन कसोटी पराभव पत्करावे लागले आहेत. ४ बाद १९८ धावांवरून दिवसाची सुरुवात करताना सौद शकील आणि इमाम-उल-हक यांनी आपापल्या अर्धशतकांसह आणि ८० धावांची संघर्षपूर्ण भागीदारी केल्यामुळे पाकिस्तानची स्थिती चांगली असल्याचे दिसत होते. पण दोन्ही फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले आणि पाकिस्तानचा डाव गडगडला.
शकील आणि इमामच्या भागीदारीने पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण वूडच्या लंचच्या आधी दोघांची विकेट घेतली आणि इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. ५ बाद २१० वरून पाकिस्तानचा डाव ९ बाद ३१९ धावांवर घसरला. ऑली रॉबिन्सनने पाकिस्तानचा अखेरचा फलंदाज मोहम्मद अलीला बाद केले आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अलीने DRS घेतला आणि त्यात तो बाद असल्याचे स्पष्ट झाले.
पण डीआरएस घेतले जात असताना आणि बेन स्टोक्स फलंदाज अलीकडे आला आणि हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. मात्र, पाकिस्तानच्या फलंदाजाने तसे करण्यास नकार दिला. तो स्टोक्सला काही तरी म्हणाला. कदाचित त्याला आठवण करून दिली की, अद्याप निर्णय मोठ्या पडद्यावर जाहीर झालेला नाही. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार माघारी परतला. बाद दिल्यानंतर हस्तांदोलन सुरू झाले व अलीने स्टोक्स आणि इंग्लंडचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले.
इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली. तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडला पाकिस्तानमध्ये कसोटी जिंकण्यात यश मिळाले. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी खेळत आहे. अब्रारने पहिल्या डावात ७ विकेट्स घेताना इंग्लंडचा २८१ धावांवर गुंडाळला. पण, पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार बाबर आजम ( ७५) व सौद शकिल ( ६३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने २०२ धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. इंग्लंडने दुसऱ्या डावात बेन डकेट ( ७९) चे अर्धशतक व हॅरी ब्रूकच्या १०८ धावांच्या जोरावर २७५ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने ४१ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३५५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली. अब्दुल्लाह शफिक ( ४५) व मोहम्मद रिझवान ( ३०) यांनी चांगला खेळ केला, परंतु मार्क वूड व अँडरसनने त्यांचा अडथळा दूर केला. सौद शकिल ( ९४), इमाम-उल-हक ( ६०) व मोहम्मद नवाज ( ४५) यांनी संघर्ष सुरू ठेवला होता. पण, इंग्लंडने कमबॅक केले. सौद शकिलची विकेट वादाचा विषय ठरली. अब्रार अहमदने मार्क वूडच्या एका षटकात तीन चौकार खेचून पाकिस्तानच्या चाहत्यांना खूश केले. पण, १७ धावांवर अँडरसनने त्याला झेल देण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा डाव ३२८ धावांत गुंडाळून इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकली. २२ वर्षांनंतर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"