Join us  

शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा

मुल्तानचं मैदान मारत पाकिस्तानच्या संघान घरच्या मैदानावरील मागील ११ कसोटी सामन्यातील लाजिरवाणी कामगिरी संपुष्टात आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 1:03 PM

Open in App

Pakistan won by 152 runs And End Their 11 match winless streak at home : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील मोठ्या बदलाचा पाकिस्तान क्रिकेट संघाचा डाव यशस्वी ठरला आहे. घरच्या मैदानात गडबडलेल्या पाकिस्तान संघाची गाडी अखेर ट्रॅकवर आली आहे. मुल्तानच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने शोएब अख्तरचा अंदाज खोटा ठरवत मोठा विजय मिळवला आहे. 

पाकच्या दोन फिरकीपटूंनी घेतली इंग्लंडची गिरकी

पाकिस्तानच्या संघाने मिळवलेल्या या दिमाखदार विजयात पदार्पणात शतकी करणाऱ्या कामरान गुलामसह दोन फिरकीपटूंनी मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात साजिद खान तर दुसऱ्या डावात नोमान अली या फिरकीपटूंनी इंग्लंड संघाची गिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यातील विजयासह पाकिस्तान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मुल्तानचं मैदान मारत पाकिस्तानच्या संघान घरच्या मैदानावरील मागील ११ कसोटी सामन्यातील लाजिरवाणी कामगिरी संपुष्टात आणली आहे. आता रावळपिंडी कसोटी सामन्यात ते मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

बाबरच्या जागेवर आलेल्या कामरान गुलामची शतकी खेळी

शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर उर्वरित २ सामन्यासाठी पाकिस्तान संघात मोठा बदल करण्यात आला. स्टार फलंदाज बाबर आझमसह शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बाबर आझमच्या जागी संघात स्थान दिलेल्या  कामरान गुलाम (Kamran Ghulam) यानं संधीच सोन करून दाखवत पदार्पणातील कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. त्याने केलेल्या २२४ चेंडूतील ११८ धावा आणि सैम अयूबच्या ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावात ३६६ धावा केल्या होत्या. 

पहिल्या डावात साजिद खान घेतली इंग्लंडची फिरकी

फलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तान संघानं इंग्लंडचा पहिला डाव २९१ धावांत आटोपला. बेन डकेटच्या शतकी खेळीशिवाय इंग्लंडच्या ताफ्यातील एकालाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पाकिस्तानकडून गोलंदाजीत साजिद खान (Sajid Khan) याने कहर केला. त्याने तब्बल ७ विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. त्याच्याशिवाय नोमान अलीनं ३ विकेट्स घेतल्या. 

दुसऱ्या डावात नोमान अलीनं साधला ८ विकेट्सचा डाव

पहिल्या डावातील  ७५ धावांच्या अप्ल आघाडीनंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या संघाने आघाडीसह दुसऱ्या डावात २२१ धावा करत इंग्लंडसमोर २९७ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ११४ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात नोमान अलीनं तब्बल ८ तर पहिल्या साजिद खान याने २ विकेट्स घेतल्या. PTV स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरनं पाकिस्तान जिंकेल, अशा विश्वास व्यक्त केला होता. पण हा सामना पाकिस्तान संघ अवघ्या ३० धावांनी जिंकेल, , असे तो म्हणाला होता. त्याचा हा अंदाज खोटा ठरवत पाकिस्तानच्या संघाने मोठा विजय मिळवून दाकवला आहे. 

  

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडबेन स्टोक्सबाबर आजम