PAK vs ENG, 3rd Test : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला घरच्या प्रेक्षकांसमोर नाक घासायला लावले. पहिल्या दोन कसोटींत सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान कराचीत संघर्ष करेल असे वाटले होते. पण, इंग्लंडच्या १८ वर्षाच्या रेहान अहमदने त्यांची कोंडी केली. पाकिस्तानी वंशाच्या रेहानने बाबर आजम अँड टीमला इंगा दाखवला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी मोहीम फत्ते केली आणि तिसरी कसोटी ८ विकेट्स राखून जिंकली. इंग्लंडने ३-० अशा फरकाने कसोटी मालिका जिंकून पाकिस्तानला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाद केले. पाकिस्तानला त्यांच्याच घरी कसोटीत व्हाईट वॉश देणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
१८ वर्षांच्या पोरासमोर पाकिस्तान झुकले! कोण आहे रेहान अहमद?
पाकिस्तानने पहिल्या डावात कर्णधार बाबर आजम ( ७६) व आघा सलमान ( ५६) यांच्या अर्धशतकाच्या बळावर ३०४ धावा केल्या. जॅक लिचने चार, तर रेहानने दोन विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडची अवस्थाही खराबच झाली होती. ऑली पोप ( ५१) व बेन फोक्स ( ६४) यांचे अर्धशतक आणि हॅरी ब्रूक ( १११) याच्या शतकाने इंग्लंडला सावरले अन् ३५४ धावा करून ५० धावांची आघाडी घेतली. अब्रार अहमद व नौमान अली यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.
अब्दुल्लाह शफिक ( २६) आणि शान मसूद ( २४) यांनी सावध सुरुवात केली खरी, परंतु त्यांना मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयश आले. बाबर आजम ( ५४) व सौद शकिल ( ५३) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, रेहानने पाकिस्तानचा डाव गुंडाळला. १६४ धावांवर त्यांची चौथी विकेट पडली अन् पुढील ५२ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला. पाकिस्तानला दुसऱ्या डावात २१६ धावा करता आल्या. रेहानने ४८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. जॅक लिचने तीन विकेट्स घेतल्या. पदार्पणात डावात पाच विकेट्स घेणारा तो युवा गोलंदाज ठरला.
१६७ धावंच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झॅक क्रॅवली ( ४१) व बेन डकेट या सलामीवीरांनी तिसऱ्या दिवशीच ११.३ षटकांत ८७ धावा चोपून निम्मी मोहिम यशस्वी केली. चौथ्या दिवशी डकेट व कर्णधार बेन स्टोक्स यांनी झटपट सामना संपवला. डकेटने ७८ चेंडूंत १२ चौकारांसह नाबाद ८२ धावा केल्या, तर स्टोक्स ४३ चेंडूंत ३५ धावावंर नाबाद राहिला. इंग्लंडने २८.१ षटकांत २ बाद १७० धावा करून विजय पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"