PAK vs ENG 3rd Test | रावळपिंडी : पाकिस्तानने तिसऱ्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवून मालिका खिशात घातली. निर्णायक कसोटी सामन्यात शान मसूदच्या नेतृत्वातील संघाने ९ गडी राखून विजय साकारला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही धाडसी निर्णय घेत बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाकावर बसवले. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संधी मिळालेल्या नोमान अली आणि साजिद खान यांनी पाकिस्तानच्या विजयात मोठे योगदान दिले. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या इंग्लंडने २६७ धावा केल्या. मग पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ३४४ धावा करुन आघाडी घेतली. पाकिस्तानने घेतलेल्या आघाडीचा दबाव इंग्लिश फलंदाजांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
इंग्लंडच्या पहिल्या डावात पाकिस्तानच्या साजिद खानने सर्वाधिक (६) बळी घेतले, तर नोमान अली (३) आणि झाहीद मेहमूदने (१) बळी घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात चमक दाखवल्याने त्यांना चांगली आघाडी मिळाली. त्यामुळे शेजारील संघाच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला. इंग्लंडचा संघ आपल्या दुसऱ्या डावात ११२ धावा करू शकला. यावेळी पाकिस्तानच्या नोमान अलीने (६) तर साजिद खानने (४) बळी घेतले. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी अवघ्या ३६ धावांची गरज होती.
दरम्यान, या मालिकेतील सलामीच्या सामन्यातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानने काही धाडसी निर्णय घेत माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाकावर बसवले. मग पदार्पणाची संधी मिळालेल्या कामरान गुलामने पहिल्याच डावात शतक झळकावून घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर साजिद खानने सर्वाधिक बळी घेण्याची किमया साधली. त्याने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात २ बळी घेऊन आपल्या संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. पाकिस्तानने दुसरा कसोटी सामना १५२ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या विजयासह शेजाऱ्यांनी तब्बल तीन वर्षांनंतर आपल्या मायदेशात कसोटी सामना जिंकला. त्यानंतर तिसरा सामना शेजाऱ्यांनी ९ बळी राखून जिंकला आणि २-१ ने मालिका आपल्या नावावर केली.
पाकिस्तानचा संघ -
शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुल शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, झाहिद मेहमूद.
Web Title: PAK vs ENG 3rd Test Match pakistan win the series with 2-1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.