लाहोर - पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी खेळवल्या गेलेल्या सहाव्या टी-२० सामन्यात इंग्लंडने धडाकेबाज खेळाच्या जोरावर पाकिस्तानला ८ विकेट्सनी पराभूत केले. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केलेली धडाकेबाज अर्धशतकी खेली इंग्लिश फलंदाजांच्या वादळासमोर फिकी पडली.
मात्र हा सामना एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच या सामन्यातील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या सामन्यात पाकिस्तानी संघ फलंदाजी करत असताना हैदर अलीने एक दणकट फटका खेळला होता. त्यानंतर हा चेंडू लेग अम्पायर अलीम दार यांच्या कमरेवर जाऊन लागला. अत्यंत वेगाने येऊन लागलेल्या चेंडूमुळे दार वेदनांनी कळवळले. मात्र त्यांना फार गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतरही संपूर्ण सामन्यात ते पंच म्हणून काम पाहताना दिसले.
अलीम दार हे चेंडूच्या टप्प्यात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही काही वेळा ते अशाप्रकारे संकटात सापडले होते. २००३ च्या विश्वचषकामध्ये भारत आणि नामिबिया यांच्यात झालेल्या सामन्यावेळी सचिन तेंडुलकरने खेळलेल्या एका थेट फटक्यामुळे अलीम दार संकटात सापडले होते. तेव्हा चेंडूपासून बचाव करताना त्यांना अगदी जमिनीवर लोळण घ्यावी लागली होती.
दरम्यान, या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडने मालिकेत ३-३ अशी बरोबरी साधली आहे. पाकिस्तानने या सामन्यात १६९ धावा काढल्या होत्या. कर्णधार बाबर आझमने ८७ धावांची खेळी केली होती. मात्र इंग्लंडने हे आव्हान सहज पार केले.