कराची : पाकिस्तान आणि इंग्लंडचे दोन्ही संघ तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या धरतीवर आमनेसामने असणार आहेत. मंगळवारी पाकिस्तान क्रिकेटने (PCB) याबाबतचे ट्विट करून अधिकृत माहिती दिली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी २०२२ (T20 World Cup 2022) इंग्लंडचा संघ सात टी-२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर असेल. १७ वर्षांनंतर इंग्लिश संघ पाकिस्तानात जात असल्यामुळे ईसीबीचा देखील उत्साह शिगेला पोहचला आहे. ही सात सामन्यांची मालिका सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ दरम्यान खेळवली जाईल. पीसीबीने या सामन्यांच्या तारखांची घोषणा केली आहे.
दरम्यान, या मालिकेची सुरूवात २० सप्टेंबर पासून कराचीमध्ये होणाऱ्या सामन्यातून होईल. पहिले चार सामने याच मैदानावर खेळवले जातील मात्र शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघांना लाहोरला जावे लागणार आहे. ऑक्टोंबरमध्ये टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजणार आहे, त्यामुळे ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची असणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा थरार ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे.
पाकिस्तान क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक जाकीर खान यांनी म्हटले की, "आम्ही कराची आणि लाहोरमध्ये सात टी-२० सामन्यांचे यजमानपद सांभाळत आहोत याचा खूप आनंद आहे. यामुळे देशातील प्रेक्षकांना याचा आनंद घेता येईल. इंग्लंडचा संघ टी-२० मधील अव्वल संघांपैकी एक आहे आणि आयसीसीचा टी-२० विश्वचषक होण्यापूर्वी आम्हाला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळल्याने नक्कीच फायदा होईल. याशिवाय इंग्लंडचा संघ टी-२० मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाला जाईल आणि विश्वचषक झाल्यानंतर पुन्हा एकदा कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर येईल."
पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड टी-२० सामनेपहिला टी-२० सामना - २० सप्टेंबर, कराचीदुसरा टी-२० सामना - २२ सप्टेंबर, कराचीतिसरा टी-२० सामना - २३ सप्टेंबर, कराचीचौथा टी-२० सामना - २५ सप्टेंबर, कराचीपाचवा टी-२० सामना - २८ सप्टेंबर, लाहोरसहावा टी-२० सामना - ३० सप्टेंबर, लाहोरसातवा टी-२० सामना - २ ऑक्टोबर, लाहोर