Harry Brook Created History But Sehwag No 1 : पाकिस्तान विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात हॅरी ब्रूकनं धमाकेदार कामगिरी करुन दाखवली. पाकिस्तानच्या मैदानात शतकी चौकार मारण्याचा पराक्रम करणाऱ्या हॅरीनं पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी त्रिशतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतील त्याचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. ब्रूकनं ३२२ चेंडूत २९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावांची खेळी केली. या खेळीसह तो फास्टर ट्रिपल सेंच्युरी करणारा क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग टॉपला आहे.
सेहवागचा वर्ल्ड रेकॉर्ड गाठण्यात कमी पडला ब्रूक
पाकिस्तान विरुद्धच्या मुल्तान कसोटीत हॅरी ब्रूकनं मुल्तानचा सुल्तान ठरलेल्या सेहवागला मागे टाकले. २००४ मध्ये सेहवागनं या मैदानात ३०९ धावांची खेळी केली होती. ब्रूक मुल्तानचा नवा सुल्तान झाला. पण सेहवागचा एक वर्ल्ड रेकॉर्ड मात्र तो मागे टाकू शकला नाही. सर्वात जलद त्रिशतक झळवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सेहवागच नंबर वन आहे. सेहवागनं दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद त्रिशतक झळकावले होते.
फास्टर ट्रिपल सेंच्युरीच्या सेहवाग टॉपला; ब्रूकनंतर या खेळाडूंचा लागतो नंबर
फास्टर ट्रिपल सेंच्युरी झळकावणाऱ्या बॅटरच्या यादीत सेहवाग आणि ब्रूक यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा नंबर लागतो. हेडन याने २००३-०४ मध्ये ३६२ चेंडूत त्रिशतक पूर्ण केले होेते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सेहवागचा नंबर लागतो. पाकिस्तान विरुद्ध त्याने ३६४ चेंडूत त्रिशतक झळकावले होते.
सर्वात जलद त्रिशतकाला गवसणी घालणारे फलंदाज
- २७८ चेंडू - वीरेंद्र सेहवाग - भारत
- ३१० चेंडू - हॅरी ब्रूक - इंग्लंड
- ३६२ चेंडू - मॅथ्यू हेडन - ऑस्ट्रेलिया
- ३६४ चेंडू - वीरेंद्र सेहवाग - भारत
- ३८१ चेंडू - करुण नायर - भारत
- ३८९ चेंडू- डेविड वॉर्नर - ऑस्ट्रेलिया
- ३९३ चेंडू - ख्रिस गेल - वेस्टइंडीज