नवी दिल्ली : इंग्लंडचा कसोटी संघ सध्या पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. तब्बल 17 वर्षांनंतर पाक धरतीवर आलेल्या इंग्लिश संघाने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आज पहिल्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस पार पडला. मात्र सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लिश संघाने शानदार फलंदाजी करून यजमान संघाला धु धु धुतले. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 101 षटकांत सर्वबाद 657 धावांची विशाल धावसंख्या उभारली. यामध्ये इंग्लंडच्या 4 खेळाडूंनी शतकी खेळी नोंदवली. मात्र पाकिस्तानने देखील त्यांच्या डावात शानदार खेळी करून सामन्यात पकड मजबूत केली आहे.
इंग्लिश संघाने यजमानांना धुतले दरम्यान, इंग्लिश संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या बळीसाठी तब्बल 233 धावांची भागीदारी नोंदवली होती. जॅक क्राऊलीने 111 चेंडूंमध्ये 21 चौकारांच्या मदतीनं 122 धावा केल्या. याशिवाय त्याने इंग्लंडकडून सलामीवीर म्हणून सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम देखील केला. यानंतर डकेटने 110 चेंडूंमध्ये 107 धावा, तर ओली पोपने 104 चेंडूंमध्ये 108 धावा आणि हॅरी ब्रुक्सने 81 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सने 15 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 नाबाद धावा केल्या. ब्रुक्सने एका षटकामध्ये 6 चौकारही ठोकले.
दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाजांचे पुनरागमन पाकिस्तानने पहिल्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात 3 बळी घेऊन पुनरागमन केले होते. परंतु क्राऊली आणि डकेटने 233 धावांची भागीदारी केली. जाहिद महमूदने १६० धावांवर दोन गडी, तर हॅरिस रौफने 78 धावा देत 1 गडी बाद केला. तर मोहम्मद अलीने 17 षटकांमध्ये 96 धावा देऊन 1 गडी बाद केला. मात्र दुसऱ्या दिवशी यजमान संघाने शानदार पुनरागमन केले आणि इंग्लंडला 657 धावांवर रोखले. पाकिस्तानकडून झाहिद महमूदने सर्वाधिक 4 बळी पटकावले, तर नसीम शाहने 3 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद अली (2) आणि हॅरिस रौफला (1) बळी घेण्यात यश आले.
इंग्लिश गोलंदाजही विकेटसाठी तरसले पाकिस्तानी संघाच्या सलामीवीरांनी दुसऱ्या दिवसाअखेर 51 षटकांत 181 धावांची भागीदारी नोंदवली. अब्दुल्ला शफीक 158 चेंडूत 89 धावांवर नाबाद आहे, तर इमाम-उल-हक 148 चेंडूत 90 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. खरं तर दुसऱ्या दिवसाअखेर कोणत्याच इंग्लिश गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या दोन्हीही सलामीवीरांनी आपल्या शतकी खेळीकडे कूच केली आहे. इंग्लिश संघाने प्रथम फलंदाजी करताना 657 धावांची विशाल धावसंख्या उभारली आहे. मात्र यजमान संघाने आज शानदार खेळी करून सामन्यात पुनरागमन केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"