Join us  

'फास्टर सेंच्युरी'सह १५२४ दिवसांनी संपला पाक कॅप्टन Shan Masood चा शतकी दुष्काळ

इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात शान मसूद याने १०२ चेंडूत शतक साजरे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:58 PM

Open in App

Pakistan vs England, 1st Test : पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद (Shan Masood) याने इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात शतकी खेळी केली.  १५२४ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्याच्या भात्यातून तीन आकडी धावसंख्या पाहायला मिळाली आहे. मादीस ४ वर्षांत २७ डावानंतर त्याने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले.  या मोठ्या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पाही गाठला आहे.

पाकिस्तानकडून फास्टर सेंच्युरी

इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात शान मसूद याने १०२ चेंडूत शतक साजरे केले. यासह त्याने खास रेकॉर्डही नोंदवला, २०१५ पासून पाकिस्तानी बॅटरनं केलेली ही सर्वात जलद सेंच्युरी ठरली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील अंतर्गत वाद आणि संघाची ढासळलेली कामगिरी कशी सुधारणार? असा प्रश्न पाकिस्तान क्रिकेटमध्ये उपस्थितीत झाला होता. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात कॅप्टननं मोठी खेळी करून संघ सावरण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.  

  • २०१९ बाबर आझम विरुद्ध श्रीलंका रावळपिंडी ११८ चेंडूत शतक
  • २०१५ मोहम्मद हाफिझ विरुद्ध बांगलादेश, खुलना १२३ चेंडूत शतक
  • २०२३ सलमान अली आगा विरुद्ध श्रीलंका १२३ चेंडूत शतक

 

इंग्लंडच्या मैदानात आलं होतं त्याचं अखेरचं शतक

शान मसूद याने याआधीची सेंच्युरी ऑगस्ट २०२० मध्ये झळकावली होती. इंग्लंड विरुद्धच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात त्याने १५६ धावांची खेळी केली होती.  त्यानंतर आता घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध त्याने शानदार खेळीसह शतकी दुष्काळ संपवला आहे. कसोटी कारकिर्दीत १५६ हिच त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. घरच्या मैदानात या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी देखील पाक कॅप्टनकडे आहे.

दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी

इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तान कॅप्टन शान मसूद याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  सैम अयुब (Saim Ayub) आणि अब्दुल्लाह शफीक (Abdullah Shafique) या सलामी जोडीनं पाकिस्तानच्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पण संघाच्या धावफलकावर अवघ्या ८ धावा असताना गस ॲटकिन्सन याने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. सैम अयुब ४ धावांची भर घालून माघारी फिरला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कॅप्टननं शफीकच्या साथीनं पाक संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीनं द्विशतकी भागीदारीसह पाहुण्या इंग्लंड संघाच्या गोलंदाजांचे खांदेच पाडले.

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड