Shadab Khan Video : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला केवळ एकच सामना खेळत आला. चार सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दोन सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले. पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लिश संघाने विजय मिळवला. मग तिसरा सामना देखील रद्द झाला. आज गुरुवारी अखेरचा सामना होत असून, हा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर आहे. आतापर्यंत केवळ एक सामना झाला, ज्यात पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. फिरकीपटू शादाब खानने त्याच्या ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या. याचाच दाखला देत एका तरूणीने शादाबची खिल्ली उडवली.
फावल्या वेळात पाकिस्तानचा खेळाडू शादाब खान हॉटेलबाहेर आला असता काही चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतली. यावेळी एका तरूणीने देखील शादाबसोबत फोटो काढला. शादाबला ट्रोल करताना संबंधित तरूणी म्हणाली की, तू एवढे षटकार कसे काय खातोस? अशा शब्दांत तिने शादाबची खिल्ली उडवली. तरूणीचा हा प्रश्न ऐकताच शादाबने शांत राहणे पसंत केले.
एकच सामना झाला अन् इंग्लंडची आघाडी आतापर्यंत केवळ एक सामना खेळवला गेला, तर दोन सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावे लागले. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या पाकिस्तानला घाम फुटला अन् २३ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८३ धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा करताना ५१ चेंडूत ८४ धावा कुटल्या. त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्याच्याशिवाय विल जॅक्सने ३७ धावांची खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला नेहमीप्रमाणे संथ खेळीचा फटका बसला. कर्णधार बाबर आझमने २६ चेंडूत ३२ धावा केल्या, मग फखर झमानने २१ चेंडूत ४५ धावा करून सामन्यात रंगत आणली. पण, इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. अखेर पाहुण्या संघाने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ १६० धावा केल्या आणि सामना २३ धावांनी गमावला.