PAK vs ENG Test Series : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभव पत्कारावा लागला. सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून, तिथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. सलामीच्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि ४७ धावांनी पराभव केल्यानंतर माजी खेळाडूंनी संताप व्यक्त केला. शोएब अख्तरने पाकिस्तानी संघातील खेळाडू, निवडकर्त्यांसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाले लक्ष्य केले. पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागील एका दशकापासून विचित्र परिस्थिती आहे. तुम्ही पेराल तेच उगवेल हे आता स्पष्ट झाले असल्याचे अख्तरने सांगितले. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून पाहुण्या इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरीत मालिकेसाठी काही धाडसी निर्णय घेतले.
संघाचा माजी कर्णधार बाबर आझम, प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि युवा गोलंदाज नसीम शाह यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातून डच्चू देण्यात आला. या तिघांना विश्रांती देण्यात आली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले. मात्र, खराब फॉर्मचा सामना करत असलेले हे त्रिकुट साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता शाहीन आफ्रिदीने पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
शाहीन आफ्रिदीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून म्हटले की, पाकिस्तानच्या संघाला खूप खूप शुभेच्छा... मजबूत पुनरागमन करण्याचा काळ आहे. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.
उर्वरीत मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ - शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, हसीबुल्लाह, कामरान घुलाम, मेहरान मुमताज, मीर हमझा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान, नोमान अली, सैय अयुब, साजिद खान, सलमान अली अघा, झाहीद मेहमूद.