Shan Masood Latest News : शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानला पुन्हा एकदा आपल्या मायदेशात कसोटी सामना गमवावा लागला. सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. खरे तर शान पाकिस्तानचा कर्णधार झाल्यापासून शेजाऱ्यांना एकही कसोटी जिंकता आली नाही. सलग सहा सामन्यांमध्ये मसूदच्या संघाने पराभव पत्करला. विशेष बाब म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ५५० हून अधिक धावा करुनही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदला या जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पावले टाकत असल्याचे कळते. पाकिस्तानातील समा टीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर शान मसूदला कर्णधारपदावरुन हटवले जाऊ शकते. सलग सहा कसोटी गमावणारा कर्णधार म्हणून शान मसूदच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आता सौद शकील, मोहम्मद रिझवान किंवा सलमान अली अघा यापैकी एकाची कर्णधारपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आज महत्त्वाची बैठक आयोजित करू शकते. या बैठकीत नवीन कर्णधाराच्या नावाची चर्चा केली जाईल. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी शान मसूदवर पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हापासून शेजाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि इंग्लंडसारख्या संघांकडून पराभव स्वीकारला आहे.
दरम्यान, क्रिकेट विश्वातील मागील काही दिवसांचा कालावधी म्हणजे पाकिस्तानी चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच... बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने पहिल्याच कसोटी सामन्यात यजमानांचा दारुण पराभव केला. फेब्रुवारी २०२१ मध्ये पाकिस्तान शेवटच्या वेळी आपल्या मायदेशात कसोटी सामना जिंकला होता. तेव्हापासून आजतागायत शेजाऱ्यांच्या खात्यात विजयाचा दुष्काळ आहे.