ब्रिस्बेन : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. स्पर्धेतील सध्या सराव सामने खेळवले जात असून आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना पार पडला ज्यामध्ये इंग्लिश संघाने 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाची वाईट अवस्था झाली. इंग्लिश गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज गारद झाले. खरं तर पावसाच्या विलंबामुळे सामना 19 षटकांचा खेळवण्यात आला. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या संघाचा नियमित कर्णधार बाबर आझमला आजच्या सामन्यात विश्रांती दिली असून त्याच्या गैरहजेरीत शादाब खानकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडच्या संघाने सांघिक खेळी करून पाकिस्तानला 19 षटकांत 8 बाद 160 धावांवर रोखले. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त हैदर अली (18), शादाब खान (18), इफ्तिखार अहमद (22) आणि मोहम्मद वसीम (26) धावा करून बाद झाला. खरं तर पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र संघाच्या 49 धावा असताना पाकिस्तानला हैदर अलीच्या रूपात पहिला झटका बसला.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करून पाकिस्तानवर दबाव टाकला. इंग्लिश संघाकडून डेव्हिड वेलीने सर्वाधिक 2 बळी पटकावले, तर बेन स्टोक्स, सॅम करन, ख्रिस जॉर्डन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. डेव्हिड वेलीने आक्रमक खेळी करणाऱ्या शान मसूदला बाद करून पाकिस्तानची फलंदाजी मोडित काढली.
इंग्लंडची विजयी सलामी इंग्लंडच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती. डावाच्या दुसऱ्याच षटकांत नसीम शाहने सलामीवीर सॉल्टचा त्रिफळा उडवून पहिला झटका दिला होता. त्यानंतर बेन स्टोक्सने आक्रमक खेळी करून डाव सावरला मात्र तोही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला मोहम्मद वसीमने तंबूत पाठवले. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक नाबाद 24 चेंडूत 45 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त बेन स्टोक्स (36), लियाम लिव्हिंगस्टोन (28) आणि सॅम करनने नाबाद 33 धावांची खेळी केली. अखेर इंग्लिश संघाने 6 गडी आणि 26 चेंडू राखून विजयी सलामी दिली.
आगामी सराव सामने खालीलप्रमाणे
19 ऑक्टोंबर -अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका भारत विरूद्ध न्यूझीलंड
रविवारी भारत-पाकिस्तान आमनेसामने टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत. भारतीय संघाने पहिला सराव सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. तर पाकिस्तानच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात इंग्लिश संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. खरं तर मागील विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यातून भारतीय संघ पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"