World Test Championship Points Table: पाकिस्तान क्रिकेट संघावर पुन्हा एकदा नामुष्की ओढावली. घरच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाने पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतरही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्नही तुटले आहे. एवढेच नाही तर WTC Points Table पाकचा संघ तळाला गेलाय. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाच्या विजयाच्या टक्केवारीत भर पडली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत बदल, इंग्लंडनं न्यूझीलंडला टाकलं मागे
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडच्या विनिंग पर्सेंटेजमध्ये वाढ झाली आहे. पण याचा अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघासह टॉप ३ मधील ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या संघावर कोणताही परिणाम झालेला नाही. इंग्लंडचा संघ गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत पाचव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. सध्याच्या घडीला इंग्लंडच्या खात्यात १७ सामन्यातील ९ विजय ७ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह इंग्लंडच्या खात्यातील विजयाच्या टक्केवारीचा आकडा हा ४५.५९ वर पोहचलाय.
पाकिस्तानचा संघ तळागाळात!
मुल्तानच्या घरच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अगदी तळाला पोहचला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या विजयाची टक्केवारी १९.५० अशी होती. आता ती टक्केवारी १६.६७ अशी घसरली आहे. वेस्टइंडीजचा संघ कोणताही सामना न खेळता आठव्या क्रमांकावर पोहचला आहे.
टीम इंडियाचा दबदबा कायम!
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठीच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ही ७४.२४० अशी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ६२.५०० अशा विजयी टक्केवारीसह दुसऱ्या तर श्रीलंकेचा संघ ५५.५६० विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. आपल्या मैदानात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायचं असेल तर इंग्लंडच्या संघाला उर्वरित सामन्यातील दमदार विजयासह भारत,ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.