नवी दिल्ली : रविवारी विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना पार पडला. पाकिस्तानने नेदरलॅंड्सचा 6 गडी राखून पराभव करून अखेर विश्वचषकात विजयाचे खाते उघडले आहे. पाकिस्तानला आपल्या पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत आणि झिम्बाब्वे यांनी पराभूत केल्यानंतर पाकिस्तान विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे. अडचणीत सापडलेला पाकिस्तानचा संघ नेदरलॅंड्सविरूद्ध विश्वचषकातील आव्हान कायम राखण्यासाठी झगडत होता. मात्र नेदरलॅंड्सच्या डावात पाकिस्तानच्या हारिस रौफने त्याच्या वेगवान चेंडूवर नेदरलँड्सचा फलंदाज बॅस डे लिड याचा डोळा जवळपास फोडलाच होता.
दरम्यान, सहाव्या षटकाचा पाचवा चेंडू हारीस रौफने बाऊन्सर टाकला आणि तो नेदरलँड्सचा अष्टपैलू खेळाडू बॅस डे लिड याच्या हेल्मेटच्या जाळीला लागून डोळ्याखाली आदळला. बॅस डे लिडला रिटायर्ट हर्ट होऊन माघारी परतावे लागले. बॅस डे लिडच्या जागी बदली खेळाडू म्हणून लॉगन व्हॅन बिक मैदानावर उतरला. हारिस रौफच्या चेंडूवर नेदरलॅंड्सच्या खेळाडूला मोठी दुखापत झाली. मात्र सामन्याच्या अखेरीस रौफने त्याची भेट घेतली आणि सर्वांची मनं जिंकली.
रौफच्या बाऊन्सरने झाली दुखापत
या सामन्यात स्टीफन मायबर्ग बाद झाल्यानंतर बॅस डी लीडे फलंदाजीसाठी मैदानात आला, मात्र काही वेळातच डावाच्या सहाव्या षटकात हारिस रौफ गोलंदाजीला आला. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने डी लीडेला बाऊन्सर टाकला, ज्याचा फलंदाजाला सामना करता आला नाही आणि चेंडू थेट हेल्मेटला लागला. बॅस डी लीडला चेंडू एवढ्या जोरात लागला की त्याच्या डोळ्याच्या खालून रक्त येऊ लागले. सामना झाल्यानंतर हारिस रौफने दुखापतग्रस्त खेळाडूची भेट घेतली. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओत हारिसने बॅस डी लीडशी संवाद साधताना म्हटले, "'मला आशा आहे तु लवकर बरा होशील. तु दुखापतीतून बरा होऊन मैदानात ये आणि मोठे षटकार मार."
खरं तर बॅस डी लीड नेदरलँड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. लीडने या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामन्यांत 80 धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने आपल्या संघासाठी 9 बळी पटकावले आहेत. हारिस रौफबद्दल भाष्य करायचे झाले तर, या वेगवान गोलंदाजाने टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत 3 सामन्यात 5.27 च्या सरासरीने गोलंदाजी करताना 4 बळी घेतले आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 3 षटकात फक्त 10 धावा दिल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: pak vs ned haris rauf ball hurt netherlands player Bas de Leede eye, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.