पर्थ : टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ नेदरलॅंड्सविरूद्ध 'करा किंवा मरा' असा सामना खेळत आहे. खरं तर दोन्हीही संघानी विश्वचषकात विजयाचे खाते उघडले नाही. पाकिस्तानी गोलंदाजीसमोर नेदरलॅंड्सचे फलंदाज चितपट झाल्याचे पाहायला मिळाले. नेदरलॅंड्स २० षटकांत ९ बाद केवळ ९१ धावा करू शकला. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक ३ बळी पटकावून प्रतिस्पर्धी संघाची कंबर मोडली. त्याच्यापाठोपाठ मोहम्मद वसीमने २ बळी घेऊन नेदरलॅंड्सला शंभरचाही आकडा गाठू दिला नाही. अखेर नेदरलॅंड्सने पाकिस्तानसमोर विजयासाठी ९२ धावांचे सोपे आव्हान ठेवले आहे.
तत्पुर्वी, नेदरलॅंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलॅंड्सच्या कर्णधाराने घेतलेला निर्णय त्यांच्याच संघाला महागात पडला. पाकिस्तानच्या आक्रमक माऱ्यासमोर कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. नेदरलॅंड्सकडून कॉलिन एकरमनने सर्वाधिक २७ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. शादाब खानने पाकिस्तानकडून सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर मोहम्मद वसीमने २ बळी घेतले. तर शाहिन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
शेजाऱ्यांना विजयासाठी ९२ धावांचे सोपे आव्हान
पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या सामन्यातील विजय पाकिस्तानला विश्वचषकात जिवंत ठेवू शकतो. याशिवाय आज होणारा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानसाठी निर्णायक असणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर शेजाऱ्यांचे विश्वचषकातील आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. नेदरलॅंड्सने पाकिस्तानला अवघ्या ९२ धावांचे आव्हान दिल्यामुळे शेजाऱ्यांचे विश्वचषकातील आव्हान कायम राहण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, फखर झमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शाह.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"