PAK vs NED । पर्थ : सध्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ नेदरलँड्सविरुद्ध 'करा किंवा मरा'चा सामना खेळत आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नेदरलँड्सच्या फलंदाजांना चितपट केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला नेदरलँडचा संघ सुरुवातीपासूनच दबावात दिसला. संघाला एकापाठोपाठ एक झटके बसत गेले. पाकिस्तानकडून शादाब खानने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन खूप व्हायरल होत आहे.
खरं तर शादाब खानने टॉम कूपरला त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद केले. मात्र या चेंडूवर षटकार मारायला हवा होता पण विकेट भेटल्याने शादाबही चकित झाला. फिल्डर वसीम ज्युनियरने डीप मिड-विकेटवर टॉम कूपरचा झेल टिपला. या चेंडूवर फलंदाजाला सहज षटकार मारता आला असता, असे समालोचकाचे देखील म्हणणे ऐकायला मिळाले. दुसरीकडे शादाब खानच्या देखील लक्षात आले की आपल्याकडून चूक झाली होती. मात्र सुदैवाने निकाल शादाबच्याच बाजूने लागला.
शादाब खानसमोर नेदरलॅंड्स क्लिन बोल्ड
तत्पुर्वी, नेदरलॅंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर नेदरलॅंड्सचे फलंदाज चितपट झाल्याचे पाहायला मिळाले. १५ षटकांपर्यंत नेदरलॅंड्ची धावसंख्या ४ बाद ६८ एवढी आहे. खरं तर या दोन्हीही संघानी विश्वचषकात अद्याप आपल्या विजयाचे खाते उघडले नाही. शादाब खानने आतापर्यंत पाकिस्तानकडून सर्वाधिक ३ बळी पटकावले आहेत. तर शाहिन आफ्रिदीला १ बळी घेण्यात यश आले. शादाब खानने ४ षटकांत केवळ २२ धावा देऊन ३ बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे शादाब खानने झिम्बाब्वेविरूद्धच्या त्याच्या अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बळी पटकावला होता. अशातच त्याने आज पहिल्या षटकातील दोन चेंडूवर बळी पटकावून विश्वचषकातील त्याची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"