Join us  

पाकिस्तानची आशिया चषकात दणक्यात सुरुवात, नेपाळवर २३८ धावांनी विजय

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धुमाकुळ घातला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 9:29 PM

Open in App

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धुमाकुळ घातला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्यांचं काम केलं अन् नेपाळचा संघ १०४ धावांत गुंडाळला. शाहिन शाह आफ्रिदीने ( २-२७) पहिल्या षटकात दोन धक्के दिल्यानंतर, हॅरिस रौफ ( २-१६) व शादाब खान ( ६.४-०-२७-४) यांनी पुढील सूत्रं हाती घेतली आणि मॅच जिंकून दिली. 

बाबर आजम- Iftikhar Ahmed यांची रेकॉर्ड ब्रेकिंग आतषबाजी; विराटसह अनेकांच्या विक्रमाची ऐशी तैशी!पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अपेक्षित सुरूवात करून दिली. शाहिन शाह आफ्रिदीने पहिल्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर नसीम शाहने दुसऱ्या षटकात नेपाळला तिसरा धक्का दिला.  शाहिन आफ्रिदीला ५ षटकं टाकल्यानंतर दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले. सोमपाल कामी व आरिफ शेख यांनी अर्धशतकी भागीदारी करून नेपाळच्या डावाला आकार दिला. १५व्या षटकात हॅरिसने ही ५९ धावांची भागीदारी तोडताना शेखचा ( २६) त्रिफळा उडवला. पुढच्या षटकातही हॅरिसने दबदबा राखला अन् दुसरा सेट फलंदाज कामीला ( २८) बाद केले. मोहम्मद रिझवानने यष्टिंमागे डाईव्ह मारून अप्रतिम झेल घेतला. नेपाळचा निम्मा संघ ८२ धावांत तंबूत परतला.  ( शाहिन आफ्रिदीच्या २ विकेट्स

शादाब खान व मोहम्मद नवाज यांनी त्यानंतर झटके दिले. शादाबच्या गोलंदाजीवर फखर झमानने अविश्वसनीय झेल घेतला. त्यानंतर त्याने संदीप लामिछानेचा त्रिफळा उडवला. शादाबने त्यानंतर पुन्हा दोन विकेट्स घेताना नेपाळचा डाव १०४ धावांत गुंडाळला. पाकिस्तानने २३८ धावांनी हा सामना जिंकला. 

तत्पूर्वी, फखर जमान ( १४),  इमाम-उल-हक ( ५) हे सलामीवीर फलकावर २५ धावा असताना माघारी परतले. बाबर व रिझवान या अनुभवी खेळाडूंनी डाव सावरला. पण, रिझवान ५० चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला आणि बाबरसह त्याची ८६ धावांची ( १०६ चेंडू) भागीदारीही संपुष्टात आली. बाबर-इफ्तिखार यांनी १३१ चेंडूंत २१४ धावांची विक्रमी भागीदारी केली.  बाबर १३१ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह १५१ धावांवर झेलबाद झाला. इफ्तिखार ७१ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १०९ धावांवर नाबाद राहिला अन् पाकिस्तानने ६ बाद ३४२ धावा चोपल्या. शेवटच्या १० षटकांत या दोघांनी १२९ धावा चोपल्या. नेपाळच्या सोमपाल कामीने ८५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :एशिया कप 2023पाकिस्ताननेपाळबाबर आजम
Open in App