नवी दिल्ली: पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. नवनिर्वाचित कर्णधार शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तान प्रथमच द्विपक्षीय मालिका खेळत आहे. पण, यजमानांनी चांगली खेळी करत पाहुण्यांचा पहिल्या दोन सामन्यात पराभव केला. पहिला सामना जिंकून यजमान संघाने विजयी सलामी दिली होती. आज झालेला दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने २-० ने आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानसमोर विजयासाठी १९५ धावांचे तगडे लक्ष्य होते. मात्र, पाकिस्तानचा संघ १९.३ षटकांत केवळ १७३ धावा करू शकला. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि फखर जमान यांनी अर्धशतके झळकावली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.
पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव बाबर आझमने ४३ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले. तर फखर जमानने २५ चेंडूत ५० धावांची स्फोटक खेळी केली. याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. या विजयासह यजमान न्यूझीलंडने ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानचा ४६ धावांनी पराभव केला होता.
दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ८ बाद १९४ धावा केल्या. किवी संघाकडून फिन अॅलनने सर्वाधिक ७४ धावा केल्या. त्याने ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७४ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडने दिलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून बाबर आणि फखर वगळता सर्व फलंदाज चीतपट झाले. अखेर पाकिस्तानी संघ १९.३ षटकांत सर्वबाद झाला अन् २१ धावांनी सामना गमावला.