sajid khan wickets : निर्णायक कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाजी कमाल करुन इंग्लंडची कोंडी केली. तीन सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंग्लंडची तारांबळ उडाली. पाहुणा संघ ६८.२ षटकांत २६७ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा फिरकीपटू साजिद खानने चमक दाखवली. त्याने सर्वाधिक सहा तर नोमान अली तीन आणि झाहिद मेहमूदला एक बळी घेण्यात यश आले. खरे तर मागील तीन डावांमध्ये पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी ३० बळी घेण्याची किमया साधली. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा पाकिस्तान आता फिरकीच्या तालावर सामने जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होत असलेला तिसरा कसोटी सामना निर्णायक आहे. यातील विजयी संघ मालिका खिशात घालेल. तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडकडून जेमी स्मिथने सर्वाधिक (८९) धावा केल्या, तर जॅक क्रॉली (२९), बेन डकेट (५२), ओली पोप (३), जो रुट (५), हॅरी ब्रूक (५), एटकिंसन (३९), रेहान अहमद (९), जॅक लीच (१६) आणि शोएब बशीर एक धाव करुन नाबाद परतला. साजिद खानने अप्रतिम कामगिरी केल्यानंतर शिखर धवनच्या शैलीत सेलिब्रेशन केले. भारतीय क्रिकेटचा गब्बर म्हणून ओळख असलेला धवन त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या साजिद खानने धवनप्रमाणे सेलिब्रेशन करताच चाहत्यांनी त्याला पाकिस्तानी गब्बर असे संबोधले.
या मालिकेतील सलामीच्या सामन्यातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानने काही धाडसी निर्णय घेत माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाकावर बसवले. मग पदार्पणाची संधी मिळालेल्या कामरान गुलामने पहिल्याच डावात शतक झळकावून घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर साजिद खानने सर्वाधिक बळी घेण्याची किमया साधली. त्याने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात २ बळी घेऊन आपल्या संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. पाकिस्तानने दुसरा कसोटी सामना १५२ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या विजयासह शेजाऱ्यांनी तब्बल तीन वर्षांनंतर आपल्या मायदेशात कसोटी सामना जिंकला.
पाकिस्तानचा संघ - शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुल शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, झाहिद मेहमूद.