pak vs nz 3rd test : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यामुळे यजमान पाकिस्तानला सुखद धक्का बसला. पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली होती. त्यामुळे मालिकेतील अखेरचा अर्थात तिसरा सामना निर्णायक असणार आहे. २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळवला जाईल. गुरुवारपासून सुरू होत असलेल्या या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला. रावळपिंडी कसोटीसाठी यजमानांनी तीन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच रावळपिंडी कसोटीसाठी शेजाऱ्यांनी तीन फिरकीपटूंना आजमावले आहे. एकूणच पाकिस्तानने वेगवान गोलंदाजांना प्राधान्य न देता भारतीय संघाप्रमाणे पाहुण्या संघाला फिरकीच्या जाळ्यात फसवण्याची रणनीती आखली.
सलामीच्या सामन्यातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानने काही धाडसी निर्णय घेत माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाकावर बसवले. मग पदार्पणाची संधी मिळालेल्या कामरान गुलामने पहिल्याच डावात शतक झळकावून घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर साजिद खानने सर्वाधिक बळी घेण्याची किमया साधली. त्याने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात २ बळी घेऊन आपल्या संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. पाकिस्तानने दुसरा कसोटी सामना १५२ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या विजयासह शेजाऱ्यांनी तब्बल तीन वर्षांनंतर आपल्या मायदेशात कसोटी सामना जिंकला. त्यामुळे उद्यापासून सुरू होत असलेला अखेरचा कसोटी सामना निर्णायक आहे. यातील विजयी संघ मालिका खिशात घालेल.
अखेरच्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुल शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली अघा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, झाहिद मेहमूद.