pak vs nz t20 । लाहोर : सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिले २ सामने जिंकून यजमान पाकिस्तानने शानदार सुरूवात केली आहे. पण काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने विजय मिळवून विजयाचे खाते उघडले आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६३ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या किवी संघाने शानदार सुरूवात केली. कर्णधार टॉम लॅथमने ४९ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. याशिवाय डेरी मिचेलने २६ चेंडूत ३३ धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यूझीलंडने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने २० षटकांत सर्वबाद केवळ १५९ धावा केल्या. इफ्तिखार अहमद (६०) व्यतिरिक्त कोणत्याच पाकिस्तानी फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर बाबर आझम (१) आणि मोहम्मद रिझवान (६) स्वस्तात परतल्यानंतर यजमानांच्या फलंदाजीची कंबर मोडली.
न्यूझीलंडने साकारला पहिला विजय
दरम्यान, न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर कोणत्याच पाकिस्तानी फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. अशातच पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने २४ चेंडूत ६० धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. ६ षटकार आणि ३ चौकार ठोकून इफ्तिखारने पाकिस्तानी चाहत्यांना जागे केले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. न्यूझीलंडकडून जिमी नीशमने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर ॲडम मिल्ने आणि रचिन रवींद्र यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय इश सोधी आणि मॅट हेनरी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन यजमानांची पळता भुई थोडी केली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात यजमान पाकिस्तानला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तानचे सामने -
- १४ एप्रिल - पहिला ट्वेंटी-२० सामना, लाहोर
- १५ एप्रिल - दुसरा ट्वेंटी-२० सामना, लाहोर
- १७ एप्रिल - तिसरा ट्वेंटी-२० सामना, लाहोर
- २० एप्रिल - चौथा ट्वेंटी-२० सामना, रावळपिंडी
- २४ एप्रिल - पाचवा ट्वेंटी-२० सामना, रावळपिंडी
- २६ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
- ३० एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
- ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
- ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
- ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: pak vs nz 3rd Twenty20 New Zealand beat Pakistan by 4 runs, Iftikhar Ahmed scored 60 and Tom Latham scored 64
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.