नवी दिल्ली : आजपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत यजमान पाकिस्तानच्या संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आजपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी यजमान पाकिस्तानने शानदार खेळी केली. संघाचा कर्णधार बाबर आझमने शतकी खेळी करून किवी संघाच्या अडचणीत वाढ केली. 53 षटकांपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 4 बाद 202 एवढी आहे.
तत्पुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानी संघाची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर अब्दुला शफीक (7) आणि इमाम उल हक (24) स्वस्तात माघारी परतले. शान मसूद केवळ 3 धावा करून मायकल ब्रेसव्हेलचा शिकार झाला. परंतु कर्णधार बाबर आझमने डाव सावरला आणि शानदार शतक झळकावले. सध्या बाबर आझम 165 चेंडूत 105 धावांवर खेळत आहे, तर सरफराज अहमद 59 चेंडूत 35 धावा करून आपल्या कर्णधाराला साथ देत आहे.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच शानदार गोलंदाजी केली. मात्र, त्यांना बाबर आझमला रोखण्यात अद्याप अपयश आले आहे. मायकल ब्रेसव्हेलने सर्वाधिक 2 बळी पटकावले, तर कर्णधार टीम साउदी आणि अजाझ पटेल यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या शतकामुळे बाबर आझम 2022 या वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, शान मसूद, इमाम उल हक, सौद शकील, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, नोमान अली, मोहम्मद वसीम, मीर हमजा, अबरार अहमद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"