PAK vs NZ 3rd T20I : न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलनच्या ( FINN ALLEN ) १६ षटकारांनी पाकिस्तानला हतबल केले. तिसर्या ट्वेंटी-२० सामन्यात फिनने पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली आणि त्याने ६२ चेंडूंत १३७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्याच्या स्फोटक फलंदाजीने केवळ ब्रँडन मॅक्क्युलमचा सर्वात मोठा विक्रमच मोडला नाही, तर वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरीही केली. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा फिन ऍलन हा न्यूझीलंडचा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सुझी बॅट्सच्या नावावर होता. तिने २०२०मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १२४ धावांची खेळी खेळली होती. मॅकलम तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१२ मध्ये बांगलादेशविरुद्ध ७२ चेंडूत १२३ धावा केल्या होत्या.
ॲलनने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला झाजईच्या नावावर १६ षटकार मारण्याचा विश्वविक्रम आहे. किवी फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीत एकाही पाकिस्तानी गोलंदाजाला सोडले नाही. त्याने प्रत्येक गोलंदाजाची चांगली धुलाई केली. हॅरिस रौफच्या एका षटकात त्याने २७ धावा चोपल्या. त्याने हॅरिसच्या षटकात ३ षटकार, २ चौकार आणि एकच धाव घेतली.
ॲलनच्या खेळीच्या जोरावर किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत २२४ धावा केल्या. ॲलन ९४ मिनिटे क्रीजवर राहिला आणि त्याने १६ षटकार आणि ५ चौकार मारले. डेव्हॉन कॉनवे लवकर बाद झाल्यानंतर फिन ऍलनने टीम सेफर्टसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. अॅलनच्या खेळीदरम्यान अंपायरला तीन वेळा चेंडू बदलावा लागला. पाकिस्तानला ७ बाद १७९ धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडने ४५ धावांनी सामना जिंकला.