लाहोर : सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. काल ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. यजमान पाकिस्तानने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानी संघाने ८८ धावांनी मोठा विजय मिळवून पाहुण्या संघाला पराभवाची धूळ चारली. किवी संघाचा पराभव झाला असला तरी मॅट हेनरीने हॅटट्रिक घेऊन कमाल केली.
दरम्यान, मॅट हेनरीने पाकिस्तानविरूद्ध आपल्या २ षटकांत ट्वेंटी-२० मधील पहिली हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने शादाब खान, इफ्तिखार अहमद आणि शाहीन आफ्रिदी यांचा पत्ता कट केला. त्याच्या शानदार स्पेलच्या जोरावर किवी संघाने पाकिस्तानला १८२ धावांवर सर्वबाद केले. हेनरीने १३व्या षटकांतील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर शादाब खान आणि इफ्तिखार अहमदला बाद केले. शादाब आणि इफ्तिखारला बाद केल्यानंतर हेनरी त्याचे अखेरचे षटक टाकण्यासाठी आला. तेव्हा पाकिस्तानी संघ १९वे षटक खेळत होता. आपल्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हेनरीने शाहीन आफ्रिदीला बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली.
पाकिस्तानची विजयी सलामीकाल झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकांत सर्वबाद १८२ धावा केल्या. सैम अयुब (४७) आणि फखर झमान (४७) यांनी केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर यजमान संघाने विशाल धावसंख्या उभारली. १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघ पूर्णपणे चीतपट झाल्याचे पाहायला मिळाले. मार्क चॅपमन (३४) वगळता कोणत्याच किवी संघाच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून हारिस रौफने सर्वाधिक ४ बळी घेतले तसेच इमाद वसीमने (२) बळी घेतले. याशिवाय शादाब खान, शाहीन आफ्रिदी, झमान खान, फहिम अशरफ यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"