Join us  

PAK vs NZ: दुसऱ्या दिवसाअखेर बळी घेण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाज तरसले; किवी संघाने यजमानांची केली धुलाई 

PAK vs NZ live: सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 7:03 PM

Open in App

कराची : सोमवारपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत यजमान पाकिस्तानच्या संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत यजमान पाकिस्तानने शानदार खेळी केली. संघाचा कर्णधार बाबर आझमने 161 धावांची शतकी खेळी करून किवी संघाच्या अडचणीत वाढ केली. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 130.5 षटकांत सर्वबाद 438 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघाच्या फलंदाजांनी देखील शानदार खेळी केली आणि पाकिस्तानी गोलंदाजांना दुसऱ्या दिवसाअखेर बळीसाठी तरसवले. 

पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 280 चेंडूत 161 धावांची खेळी केली. सरफराज अहमद (86) आणि अघा सलमान याने 103 धावांची शतकी खेळी करून पाहुण्या संघासमोर धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात शानदार झाली आहे. दोन्हीही सलामीवीर दुसऱ्या दिवसाअखेर नाबाद आहेत. टॉम लॅथम (78) आणि डेव्होन कॉन्वे (82) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. किवी संघाने दुसऱ्या दिवसाअखेर 47 षटकांत 165 धावा केल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात अद्याप यश आले नाही. 

सरफराज अहमदला मिळाली संधी पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघात अनुभवी सरफराज अहमदला स्थान मिळाले आहे. त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत कर्णधार बाबर आझमची साथ देताना 153 चेंडूत शानदार 86 धावांची खेळी केली. सरफराज अहमद पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. खरं तर पहिल्या सामन्यासाठी मोहम्मद रिझवानला वगळण्यात आले असून यष्टीरक्षक सरफराज अहमदला स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरूद्धची मालिका 0-3 ने गमावल्यामुळे ही मालिका यजमान पाकिस्तानच्या संघासाठी महत्त्वाची असणार आहे. सरफराज अहमद आपल्या कारकिर्दीतील 50वा कसोटी सामना खेळत आहे. 

पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, शान मसूद, इमाम उल हक, सौद शकील, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, नोमान अली, मोहम्मद वसीम, मीर हमजा, अबरार अहमद.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :न्यूझीलंडपाकिस्तानबाबर आजम
Open in App