ठळक मुद्देन्यूझीलंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजयफिरकीपटू अजाझ पटेलचा सिंहाचा वाटाअजाझ पटेलचा जन्म मुंबईचा
मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सोमवारी विक्रमी कामगिरी केली. पाकिस्तान संघावर चार धावांनी मात करून न्यूझीलंडने कसोटीतील सर्वात कमी धावांच्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या धावा करतानाही पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट झाली. फिरकीपटू अजाझ पटेलने पाकिस्तानची शेपूट गुंडाळून हा ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंडच्या विजयाचा हा शिल्पकार जन्माने मुंबईकर आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या पाकविरुद्धच्या या विजयाने आपली छातीही अभिमानाने भरून येणारच. गेली २२ वर्षे अजाझ न्यूझीलंडमध्ये वास्तवास आले. वयाच्या ३० व्या वर्षी त्याने किवी कसोटी संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात दणका उडवून दिला. कसोटी पदार्पणात न्यूझीलंडकडून सर्वाधिक (७) विकेट घेणारा तो दुसरा खेळाडू ठरला. न्यूझीलंडमध्ये वाढला- शिकला असला तरी हिंदी व गुजरातीची उत्तम जाण असलेल्या अजाझचे हे गुपित पाक खेळाडूंना माहित नसावे. म्हणून त्याच्यासमोर ते सर्रास हिंदीत संवाद करत होते. इथेच ते फसले. आठ वर्षांचा असताना अजाझ कुटुंबीयांसोबत न्यूझीलंडला स्थलांतरित झाला. मुंबईकर असल्याने घरच्यांना क्रिकेटचे भारी वेड, पण अजाझ क्रिकेटपासून दूर राहायचा. त्याच्या काकांनी न विचारता त्याचे नाव क्रिकेट अकादमीत नोंदवले आणि त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. घरी क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना नावं ठेवणारा अजाझ आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाला. राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर त्याने याच नातेवाईकांना पार्टीसाठी आग्रहाने बोलावले होते. स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करून राष्ट्रीय संघाचे तिकीट पटकावले आणि पहिल्याच सामन्यात निवड सार्थ ठरवली. न्यूझीलंडकडून कसोटी खेळणारा तो भारतीय वंशाचा पाचवा खेळाडू आहे.
मुंबई इंडियन्सचा जबरा फॅनअजाझला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळायचे आहे आणि मुंबई इंडियन्स हा त्याचा फेव्हरेट संघ आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईत आला असताना त्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी केली होती.