pak vs nz t20 series । रावळपिंडी : पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने यजमानांच्या तोंडचा घास पळवला. पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. काल या मालिकेतील अखेरचा सामना पार पडला, ज्यात पाहुण्या न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून यजमान संघाने २-० ने आघाडी घेतली होती. तर तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. अखेरचे दोन्ही सामने जिंकून किवी संघाने २-२ अशी मालिकेत बरोबरी साधली आणि पाकिस्तानच्या स्वप्नांचा चुराडा केला.
दरम्यान, मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे पाकिस्तानी संघ सहज मालिका जिंकेल असे अपेक्षित होते. कारण न्यूझीलंडच्या संघाचे वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना किवी संघात संधी मिळाली आहे. पण असे असताना देखील पाकिस्तानला आपल्या घरात मालिका गमवावी लागली. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने दुसऱ्या सामन्यात शतक ठोकून पाहुण्या संघाचा दारूण पराभव केला होता. त्यानंतर यजमान संघाला प्रभावी कामगिरी करता आली नाही आणि अखेर मालिका देखील जिंकता आली नाही.
अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजयकाल झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १९३ धावा केल्या. सलामीवीर मोहम्मद रिझवानने ६२ चेंडूत ९८ धावांची शानदार खेळी केली. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाची सुरूवात निराशाजनक झाली. कर्णधार टॉम लॅथम (०), चाड बोवेस (१९), डेरी मिचेल (१५) विल यंग (४) स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर मार्क चॅपमन शो सुरू झाला आणि त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला. जिमी नीशमने २५ चेंडूत ४५ धावा करून चॅपमॅनला साथ दिली. लक्षणीय बाब म्हणजे मार्क चॅपमनने ५७ चेंडूत १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या संघाने १९.२ षटकांत १९४ धावा करून विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. ट्वेंटी-२० मालिकेनंतर २६ एप्रिलपासून दोन्ही संघांमध्ये वन डे मालिका खेळवली जाणार आहे.
पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका
- २६ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
- ३० एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
- ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
- ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
- ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"