पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून पाकिस्तानी संघाने १-४ अशा फरकाने मालिका गमावली. पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. पाकिस्तानी संघ प्रथमच नवनिर्वाचित कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात द्विपक्षीय मालिका खेळत होता. ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले चार सामने गमावल्यानंतर अखेर पाकिस्तानला विजय मिळाला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानी संघाने किवींचा ४२ धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ गडी गमावून १३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ अवघ्या ९२ धावांत गडगडला. क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना इथे भरपूर मदत मिळाली. त्यामुळेच कमी धावसंख्येवर रोखूनही पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हसीबुल्ला खानला पदार्पणाची संधी मिळाली पण तो सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
पाकिस्ताननं लाज वाचवली!मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी 53 धावांची भागीदारी करत पाकिस्तान संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले, ही भागीदारी संथ होती. फखर जमानने येऊन धावगती वाढवण्याची जबाबदारी घेतली. १६ चेंडूत ३३ धावा करून तो बाद झाला. पाकिस्तानने सांघिक खेळी करत निर्धारित २० षटकांत ८ बाद १३४ धावा केल्या.
१३५ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. सलामीवीर रचिन रवींद्र (१) आणि फिन ॲलन (२२) धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्स (२६) वगळता एकही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेर संपूर्ण किवी संघ १७.२ षटकांत ९२ धावांत गारद झाला. या विजयासाठी पाकिस्तानला मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात यश आले.