नवी दिल्ली : आजपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत यजमान पाकिस्तानच्या संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेत शाहिद आफ्रिदीची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड केली.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी आफ्रिदीची अध्यक्ष म्हणून निवड केली. पीसीबी व्यवस्थापन समितीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, या समितीमध्ये अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार अंजुम यांचा समावेश आहे. याशिवाय, हारुण रशीद हे संयोजक म्हणून असणार आहेत. अशी माहितीही पीसीबीने दिली.
सरफराज अहमदला मिळाली संधी शाहिद आफ्रिदीने आगामी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ जाहीर केला त्यामध्ये काही नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. मात्र, आज होत असलेल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला आफ्रिदीने सावध भूमिका घेत अनुभवी सरफराज अहमदला संघात स्थान दिले. सरफराज अहमद पाकिस्तानी संघाचा कर्णधार राहिला असून त्याच्या नेतृत्वात संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. खरं तर पहिल्या सामन्यासाठी मोहम्मद रिझवानला वगळण्यात आले असून यष्टीरक्षक सरफराज अहमदला स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरूद्धची मालिका 0-3 ने गमावल्यामुळे ही मालिका यजमान पाकिस्तानच्या संघासाठी महत्त्वाची असणार आहे. सरफराज अहमद आपल्या कारकिर्दीतील 50वा कसोटी सामना खेळत आहे.
पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, शान मसूद, इमाम उल हक, सौद शकील, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, नोमान अली, मोहम्मद वसीम, मीर हमजा, अबरार अहमद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"