PAK vs NZ: पाकिस्तानी संघ सध्या पाक आर्मीसोबत प्रशिक्षण घेत आहे. आगामी द्विपक्षीय मालिका आणि ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या फिटनेसवर विशेष भर दिला आहे. शाहीन आफ्रिदीची हकालपट्टी करून पुन्हा एकदा बाबर आझमला कर्णधार बनवण्यात आले आहे. आगामी काळात न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून तिथे ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे.
आयपीएलमुळे न्यूझीलंडच्या वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. याचाच दाखला देत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला लक्ष्य केले. तो म्हणाला की, पाकिस्तानी संघाला कोणीच गांभीर्याने का घेत नाही? बाबर आझमला पुन्हा कर्णधार बनवले याचे मी स्वागत करतो. पण सर्वच संघ पाकिस्तानविरूद्ध हलका संघ उतरवतात. ते आपल्याला गांंभीर्याने घेत नाहीत. हे बदलायला हवे. यासाठी पाकिस्तानी संघात चांगल्या खेळाडूंची फौज तयार करणे गरजेचे आहे. अकमल पाकिस्तानातील माध्यमांशी बोलत होता.
आयपीएलमुळे न्यूझीलंडच्या संघातील वरिष्ठ खेळाडू पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेला मुकणार आहेत. यामध्ये ट्रेन्ट बोल्ट, केन विल्यमसन, टीम साऊदी, डेव्हिड कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, विल यंग आणि टॉम लॅथम हे न्यूझीलंडच्या संघाचा भाग नाहीत.
पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ -
मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), फिन अलेन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, Cole McConchie, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, Will O’Rourke, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी.
PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
- १८ एप्रिल - रावळपिंडी
- २० एप्रिल - रावळपिंडी
- २१ एप्रिल - रावळपिंडी
- २५ एप्रिल - लाहोर
- २७ एप्रिल - लाहोर