Pakistan vs New Zealand T20 Series: जूनमध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा अर्थात ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडणार आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांटी ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. आगामी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून पाकिस्तान सुपर लीगनंतर ही मालिका खेळवली जाईल. मात्र आता या मालिकेपूर्वीच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी न्यूझीलंडचे शिष्टमंडळ पाकिस्तानात पोहोचले आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानला पोहोचले आहे. या शिष्टमंडळात न्यूझीलंड क्रिकेटचे दोन सदस्य आणि एका स्वतंत्र सुरक्षा तज्ज्ञाचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ शेजारील देशाला भेट देण्यासाठी लाहोर, रावळपिंडी आणि इस्लामाबादला पोहोचले आहे.
न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरापाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची मालिका एप्रिलमध्ये लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडचे शिष्टमंडळ सामन्याच्या ठिकाणांना आणि संघ ज्या हॉटेल्समध्ये मुक्काम करणार आहे त्यांना भेट देणार आहे. संघाच्या सुरक्षा आराखड्याबाबतही ते सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. शिष्टमंडळात न्यूझीलंड प्लेयर्स असोसिएशनच्या सीईओचाही समावेश आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा पाकिस्तानी संघाला ४-१ ने पराभवाला सामोरे जावे लागले. या दौऱ्यानंतर पाकिस्तानी संघाचे संचालक मोहम्मद हाफिजला हटवण्यात आले. पाकिस्तानी संघ २०२३ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही. संघ उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. यानंतर बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर शान मसूदकडे कसोटी आणि शाहीन आफ्रिदीकडे ट्वेंटी-२० संघाची धुरा सोपवण्यात आली.