PAK vs NZ T20 Series: पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून तिथं पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. नवनिर्वाचित कर्णधार शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तानी संघ द्विपक्षीय मालिका खेळत आहे. अलीकडेच पार पडलेल्या कसोटी मालिकेत शेजाऱ्यांना ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानचा ३-० ने पराभव झाला. त्यामुळं किवी संघाला पराभूत करून विजयाच्या पटरीवर परतण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर आहे. मालिकेच्या पूर्वसंध्येला कर्णधार आफ्रिदीने पत्रकार परिषद घेतली आणि रणनीती सांगितली.
आगामी मालिकेबद्दल बोलताना आफ्रिदीने विविध बांबीवर प्रकाश टाकला. माजी कर्णधार बाबर आझमच्या खेळीला दाद देत त्याचं कौतुक केलं. दरम्यान, आफ्रिदीनं वेगवान गोलंदाजांविषयी एक मिश्किल विधान केलं, जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी गोलंदाजांना त्यांच्या गतीसाठी खासकरून ओळखलं जातं. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर शेजारी गारठले. त्यांना साजेशी देखील कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई झाली. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शेजाऱ्यांच्या गोलंदाजांना गती मिळवता आली नाही. त्याचाच फायदा घेत कांगारूंनी इतिहास कायम ठेवत सलग २९व्या वर्षी पाकिस्तानला मोकळ्या हातांनी घरी पाठवले.
गोलंदाजांची गती कमी झाली असल्याबद्दल आफ्रिदीनं मिश्किलपणे म्हटलं, "मलाही यावर विश्वास बसत नाही... मी गोलंदाजी करत असताना सतत फलकावर पाहायचा... कधी कधी तर असं वाटायचं की खरंच हे आपण आहोत की दुसरं कोण? कारण तिथे काहीच समजत नव्हतं. जे शरीर सुरूवातीपासून चांगल्या गतीने गोलंदाजी करायला साथ द्यायचं ते आता मात्र त्यासाठी तयारी नाही असं वाटायचं... १३२-१३३ च्या वेगाने गोलंदाजी होत आहे यावर माझाही विश्वास बसत नाही."
बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला अन् पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवनिर्वाचित कर्णधारांची घोषणा केली. शान मसूदकडे कसोटी तर शाहीन आफ्रिदीकडे ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारतीय संघाप्रमाणेच पाकिस्तान देखील द्विपक्षीय मालिकांसाठी नव्या चेहऱ्यांना आजमावून पाहत आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - शाहीन आफ्रिदी (कर्णधार), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान, अबरार अहमद, बाबर आझम, फखर झमान, हारिस रौफ, हसिबुल्लाह खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (उपकर्णधार), मोहम्मद वसिम, सहिबझादा फर्हान, सैय अयुब, उसामा मीर, झमान खान.
पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा -
- १२ जानेवारी - पहिला सामना
- १४ जानेवारी - दुसरा सामना
- १७ जानेवारी - तिसरा सामना
- १९ जानेवारी - चौथा सामना
- २१ जानेवारी - पाचवा सामना