Join us  

PAK vs NZ Test : यासिर शाहचा पराक्रम, कुंबळेनंतर अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

Pak vs NZ Test: पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासीर शाहने विक्रमी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:44 AM

Open in App

दुबई, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी : पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासीर शाहने सोमवारी विक्रमी कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत यासीरने पहिल्या डावत 8 विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या डावातही न्यूझीलंडला दोन धक्के दिले. 1999 साली भारताच्या अनिल कुंबळेने कसोटीच्या एका दिवसात दहा विकेट घेतल्या होत्या. त्याच्यानंतर अशी कामगिरी करणारा यासीर हा पहिलाच गोलंदाज ठरला. कुंबळेने एकाच डावात दहा विकेट घेतल्या होत्या. त्याने 1999 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या कसोटीत पाकिस्तानच्या दहाच्या दहा फलंदाजांना बाद केले होते. एका डावात दहा बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. त्याआधी 1956 मध्ये इंग्लंडच्या जिम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.  पाकिस्तानने पहिला डाव 5 बाद 418 धावांवर घोषित केला. त्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला जीत रावल आणि टॉम लॅथम यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, यासीर शाहने किवींची दैना उडवली. पुढील एक तास 15 मिनिटांत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ माघारी परतला. बिनबाद 50 वरून सर्वबाद 90 अशी न्यूझीलंडची केविलवाणी अवस्था झाली होती. यासीरने 8 विकेट्स घेतल्या आणि किवींच्या सहा खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. यासीरची ही कामगिरी पाकिस्तानच्या गोलंदाजाने केलेली तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 2 बाद 131 धावा झाल्या होत्या. किवी संघ अद्याप 197 धावांनी पिछाडीवर आहे.  

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंड