Join us  

PAK vs NZ Test : न्यूझीलंडच्या दहाव्या विकेटने पाकिस्तानला रडवले, त्यानंतर सहकाऱ्याने बाबर आजमला बाद केले 

PAK vs NZ : पाकिस्तानने २०२३ मध्येही कसोटीत निराशाजनक कामगिरी कायम राखल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कराची येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 4:52 PM

Open in App

PAK vs NZ : पाकिस्तानने २०२३ मध्येही कसोटीत निराशाजनक कामगिरी कायम राखल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कराची येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. किवी फलंदाज डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) याच्या शतकानंतर किवींचा डाव गडगडला होता, परंतु मॅट हेन्री व अजाध पटेल यांनी दहाव्या विकेटसाठी विक्रमी १०४ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरले. २ बाद २३४ वरून न्यूझीलंडची अवस्था ९ बाद ३४५ अशी झाली होती, परंतु हेन्री व पटेल यांनी संघाला ४४९ धावांपर्यंत पोहोचवले. त्यात फलंदाजीला आलेल्या कर्णधार बाबर आजमला ( Babar Azam) सहकारी इमाम-उल-हकने बाद केले. 

Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला

पहिली कसोटी ड्रॉ राखल्यामुळे पाकिस्तानी खेळाडू आनंदात होते. पण, किवींनी दुसऱ्या कसोटीत दमदार फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या फ्लॅट खेळपट्टी चर्चेचा विषय बनत आहे. टॉम लॅथम आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. लॅथम १०० चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला. कॉनवे व कर्णधार केन विलियम्सन यांनी शतकी भागीदारी केली. आघा सलमानने शतकवीर कॉनवेला १२२ धावांवर बाद केले. त्यानंतर नसीम शाहने केनची ( ३६) विकेट घेतली. आघा सलमानने एकामागून एक धक्के देताना किवींचा बॅकफूटवर फेकले. पण, टॉम ब्लंडलने ५१ धावांची खेळी करताना किवींना आधार दिला. 

त्यात हेन्रीच्या नाबाद ६८ व पटेलच्या ३५ धावांनी संघाला ४४९ धावांपर्यंत पोहोचवले. अब्रार अहमदने चार, सलमान व नसीमने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. २०१०मध्ये अबुधाबी येथे एबी डिव्हिलियर्स व मॉर्ने मॉर्केल यांनी पाकिस्तानविरूद्ध दहाव्या विकेटसाठी नाबाद १०७ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर हेन्री व पटेल यांची भागिदारी सर्वोत्तम ठरली.  

किवींच्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात वाईट झाली. अब्दुल्लाह शफिक ( १९) व शान मसूद ( २०) हे बाद झाले. सलामीवीर इमाम उल हक व कर्णधार बाबर आजम संघाचा डाव सावरतील असे आशादायक चित्र दिसत होते. पण, इमामने कर्णधाराला बाद केले. तिसरी धाव घेण्यासाठी आधी इमामने बाबरला कॉल दिला अन् कर्णधार क्रिज सोडून बराच पुढे आल्यानंतर इमाम माघारी फिरला. किवींना आयती विकेट मिळाली. पाकिस्तानच्या ११८ धावांत ३ विकेट्स पडल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमन्यूझीलंड
Open in App