कराची : सोमवारपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत यजमान पाकिस्तानच्या संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी यजमान पाकिस्तानने शानदार खेळी केली. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात 130.5 षटकांत सर्वबाद 438 धावा केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने देखील शानदार खेळी केली. किवी संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या बळीसाठी 183 धावांची भागीदारी नोंदवली. टॉम लॅथमने 113 धावांची शतकी खेळी केली तर डेव्होन कॉन्वेने 176 चेंडूत 92 धावांची शानदार खेळी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी संघाला किवी संघाचा पहिला बळी घेण्यात यश आले. केन विल्यमसन 222 चेंडूत 105 धावांची शतकी खेळून खेळपट्टीवर टिकून आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 136 षटकांत 6 बाद 440 एवढी झाली आहे. किवी संघाने 2 धावांची आघाडी घेऊन सामन्यात पकड बनवली आहे. लक्षणीय बाब म्हणजे केन विल्यमसनने तब्बल 722 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे.
सरफराज अहमदला मिळाली संधी पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघात अनुभवी सरफराज अहमदला स्थान मिळाले आहे. सरफराज अहमद पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. खरं तर पहिल्या सामन्यासाठी मोहम्मद रिझवानला वगळण्यात आले असून यष्टीरक्षक सरफराज अहमदला स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरूद्धची मालिका 0-3 ने गमावल्यामुळे ही मालिका यजमान पाकिस्तानच्या संघासाठी महत्त्वाची असणार आहे. सरफराज अहमद आपल्या कारकिर्दीतील 50वा कसोटी सामना खेळत आहे.
पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, शान मसूद, इमाम उल हक, सौद शकील, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, नोमान अली, मोहम्मद वसीम, मीर हमजा, अबरार अहमद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"